हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी केली रेकी? व्हिडीओ आला समोर..

0
6

दि . २७ ( पीसीबी ) पिंपरी-चिंचवड | पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील दहशतवाद्यांचा शोध तपास यंत्रणा आणि लष्कराकडून घेतला जात आहे. तब्बल २८ निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या या दहशतवाद्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवला असून, त्यापूर्वी रेकी केल्याचेदेखील समोर आले आहे. या ‘थिअरी’ला पुष्टी देणारा एक व्हिडीओ समोर आला असून, देहूरोड येथे राहणाऱ्या पर्यटकाच्या मोबाईलमध्ये १९ एप्रिल रोजीच्या चित्रीकरणात दोन संशयित दहशतवादी चित्रित झाले आहेत.  घटनेच्या तीन दिवस आधीच्या या व्हिडीओमध्ये हे संशयित पहलगामच्या मिनी स्वित्झर्लंडमध्ये फिरत असतानाचा हा व्हिडीओ आहे. संबंधित पर्यटकाने ही माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात, ‘एनआयए’ला दिली आहे.    

देहूरोड येथे राहणाऱ्या श्रीजित रमेशन यांनी ही माहिती ‘सीविक मिरर’ला दिली. रमेशन हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. ते कुटुंबासह काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हल्ला झाला. त्यापूर्वी १९ एप्रिल रोजी रमेशन कुटुंबीय पहलगाम येथे गेलेले होते. पर्यटन पूर्ण झाल्यानंतर ते पुण्यात परतले. दरम्यान, त्यांना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले. तपास यंत्रणांनी हल्लेखोरांची छायाचित्रे प्रसारित केली होती. तसेच, चार दहशतवाद्यांचे एक छायाचित्रदेखील प्रसारित झाले होते. ही तपास यंत्रणांनी जाहीर केलेली रेखाचित्रे आणि छायाचित्रं सोशल मीडियाद्वारे रमेशन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाहण्यात आली. 

सहलीदरम्यान काढलेली छायाचित्रे आणि चित्रफिती सर्व कुटुंब पाहात होते. या चित्रफिती पाहात असतानाच त्यांच्या छोट्या मुलीच्या एका व्हिडीओमध्ये तिच्या पाठीमागून दोन संशयित दहशतवादी चालत जात असल्याचे दिसले. त्यांनी पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघितला, तेव्हा त्यांना प्रसारित झालेल्या छायाचित्रातील हेच दहशतवादी असावेत, असा संशय आला. त्यामुळे त्यांनी शनिवारी दिल्लीतील राष्ट्रीय तपास यंत्रणेशी (एनआयए) संपर्क साधला. आपल्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो आणि व्हिडीओ त्यांनी ‘एनआयए’ला पुढील तपासाच्या अनुषंगाने पाठविले आहेत.

रमेशन म्हणाले, ‘‘आम्ही १८ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे भेट दिली होती. बेसरण व्हॅलीलादेखील गेलो होतो. दुपारी आम्ही तिथून सुमारे साडेसात किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटाब व्हॅलीमध्ये गेलो. त्यानंतर आम्ही गुलमर्ग आणि श्रीनगरला भेट दिली. २१ एप्रिल रोजी जम्मूकडे प्रयाण केले. २२ एप्रिल रोजी आम्हाला आमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून फोन आणि संदेश येऊ लागले, आमच्या कुशलतेची चौकशी होत होती, कारण दहशतवादी हल्ल्याची बातमी येत होती आणि त्या हल्ल्यात पुण्याच्या पर्यटकांचा बळी गेला असल्याचे समजत होते. मी स्वतः पुण्याहून गेल्यामुळे आमच्या मित्रपरिवाराला काळजी वाटत होती. आम्ही पुण्यात सुरक्षित पोहोचल्यावर सुरक्षा दलांनी जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या फोटोवर आमची नजर पडली.’’

त्यांच्या हालचाली होत्या संशयास्पद…

त्या फोटोंमधील दोन चेहरे आम्हाला पाहिल्यासारखे वाटले. आम्ही पहलगाम आणि बेटाब व्हॅलीमध्ये काढलेल्या सर्व फोटोंची तपासणी केली. अखेर माझ्या मुलीच्या रील्ससाठी शूट केलेल्या एका व्हिडीओत आम्हाला हे संशयित दिसले. या व्हिडीओमध्ये दोन संशयित व्यक्ती स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्याची रचना, देहबोली आणि पेहराव हे सर्व सुरक्षा दलांनी प्रसिद्ध केलेल्या दहशतवाद्यांच्या फोटोंशी खूपच मिळते-जुळते आहे, असे आम्हाला वाटले. हल्ल्याच्या तीन दिवस आधी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आम्ही हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यांची हालचाल संशयास्पद वाटली होती, अशी माहिती श्रीजित रमेशन यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

“पहलगाम येथे हल्ला करणाऱ्यांना आम्ही तीन दिवस आधीच काश्मीरमध्ये पाहिले होते. आम्ही काढलेल्या व्हिडीओमध्ये दोन संशयित आणि त्यांच्या हालचाली कैद झालेल्या दिसत आहेत. याबाबत तपास यंत्रणांनी योग्य ती पडताळणी करावी. तसेच, आवश्यकतेनुसार तपास करावा. त्याकरिता संबंधित व्हिडीओ आणि माहिती एनआयएला कळविली आहे.”