हल्ल्यातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले

0
147

दि १४ एप्रिल (पीसीबी )- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्या रोड शोवर दगडफेक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा रोड शो सुरू असताना अचानक दगडफेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दिशेनेच दगड भिरकावण्यात आले. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनाही या दगडाचा मारा बसला आहे. त्यांच्या कपाळावर दगड येऊन आदळल्याने कपाळाला खोच पडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर तात्काळ उपचार करण्यात आले. मात्र, दगडफेकीच्या घटनेमुळे आंध्रप्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.
विजयवाडाच्या सिंहनगरमध्ये जगन मोहन रेड्डी यांचा बसमधून रोड शो सुरू होता. त्यावेळी एका अज्ञात इसमाने त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यातील एक दगड मुख्यमंत्र्यांच्या कपाळाला लागला आहे. अगदी डोळ्याच्यावर भुवयांजवळ दगड लागल्याने मोठी खोच पडली. मुख्यमंत्री जखमी होताच बसमध्ये असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी पुन्हा निवडणूक प्रचार सुरू केला.
वायएसआर काँग्रेस पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच जोर पकडला आहे. त्यांनी राज्यात वुई आर रेडी हे कँम्पेन सुरू केलं आहे. बसमधून ही मोहीम राबवली जात आहे. त्यानिमित्ताने स्वत: जगन मोहन रेड्डीही या कॅम्पेनमध्ये सहभागी झाले होते. उघडया बसमधून त्यांचं कॅम्पेन सुरू होतं. पण इतक्यात कोणी तरी त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. यातील एक दगड मुख्यमंत्र्यांच्या कपाळाला भुवयांच्या जवळ लागला. त्यामुळे खोच पडली. यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यांच्या कपाळाला दोन टाके मारण्यात आले आहेत. सुदैवाने या हल्ल्यातून मुख्यमंत्र्यांचा डोळा थोडक्यात बचावला आहे.
दरम्यान, आंध्रपदेशातील विधानसभेच्या 175 आणि लोकसभेच्या 25 जागांसाठी मतदान होत आहे. येत्या 13 मे रोजी या दोन्ही निवडणुकीसाठी आंध्रप्रदेशात मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआरसीपीने 151 जागा आणि लोकसभेच्या 22 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी राज्यात टीडीपी, भाजप आणि जन सेनेची आघाडी झाली आहे. त्यामुळे जगन मोहन रेड्डी यांच्यासमोर मोठं आव्हान असल्याचं सांगितलं जात आहे.