मुंबई, दि. 18 –
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या घरात हल्ला झाला. घरात शिरलेल्या दरोडेखोराने चाकूने वार केले, यात सैफ गंभीर जखमी झाला. या घटनेला दोन दिवस उलटले असून पोलीस त्या हल्लेखोराचा शोध घेत होते, आता या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज (शनिवारी) मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतलं. सध्या अधिकारी त्याची चौकशी करत आहेत, असे वृत्त इंडिया टुडे टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सैफवर हल्ला करणाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले होते, त्यानंतरचे त्याचे वांद्रे व दादरमधील फोटो समोर आले होते. आता या प्रकरणी मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
हल्लेखोराने सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर कपडे बदलले होते. दोन ठिकाणी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता, त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. अभिनेत्यावर हल्ला होऊन ५० तासांहून अधिक काळ लोटला, तरीही हल्लेखोराचा शोध सुरूच आहे. घुसखोराचे एक ताजे सीसीटीव्ही फुटेज आदल्या दिवशी समोर आले होते, ज्यामध्ये तो सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसला होता. आता एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.