हरीश साळवेंच्या तिसऱ्या लग्नाला हजारो कोटींचा अपहार करणाऱ्या ललित मोदीची हजेरी…

0
398

विदेश,दि.०५(पीसीबी) – भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध विधिज्ञ हरीश साळवे यांनी रविवारी लंडनमध्ये तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. ब्रिटिश नागरिक असलेल्या त्रिना हिच्याशी हरिश साळवेंनी लग्नगाठ बांधली आहे. परंतु आता हे लग्न वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण हजारो कोटी रुपयांचा अपहार करून विदेशात फरार झालेल्या ललित मोदीने हरिश साळवेंच्या लग्नात हजेरी लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ललित मोदी इतरांना चिअर्स करत आनंदोत्सव साजरा करत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हरिश साळवे यांच्या तिसऱ्या लग्नाला मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी, स्टील टायकून, लक्ष्मी मित्तल आणि मॉडेल उज्ज्वला राऊत यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचवेळी ईडीने फरार घोषित केलेल्या ललित मोदीनेही साळवेंच्या लग्नात हजेरी लावली आहे. करचोरी आणि मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू असतानाच ललित मोदी विदेशात फरार झाला होता. त्यामुळं आता ललित मोदी भारताच्या माजी सॉलिसिटर जनरलच्या तिसऱ्या लग्नामध्ये कशासाठी आला आहे?, ललित मोदी आणि हरिश साळवे यांचे काय संबंध आहे?, असे सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

जेष्ठ विधिज्ञ हरिश साळवे इंग्लंडमध्ये राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच साळवे यांची वन नेशन वन इलेक्शन या उच्चस्तरीय समितीवर नियुक्ती केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष आहे. त्यामुळं आता साळवेंच्या लग्नात ललित मोदीने हजेरी लावल्याने मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. ‘ललित आणि नीरव मोदीला चोर म्हटल्यामुळं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती, हरिश साळवेंनी मोदीचा बचाव केला. आता ललित मोदी हरिश साळवे यांच्यासोबत काय करतोय?, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते प्रितेश शहा यांनी उपस्थित केला आहे.