हरित सेतू प्रकल्पाबाबत पालिकेत बैठक; महापौरांकडून काम तात्पुरते थांबवण्याचे निर्देश

0
2


दि.१७(पीसीबी)-हरित सेतू प्रकल्पाबाबत नागरिकांकडून व्यक्त होत असलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांच्या पुढाकाराने महापौरांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या भावना व आक्षेप महापौरांसमोर मांडण्यात आले.

बैठकीला महानगरपालिकेचे अधिकारी बापू गायकवाड, सुनील पवार आणि प्रसन्न देसाई उपस्थित होते. नागरिकांचे म्हणणे ऐकल्यानंतर महापौरांनी अंतरिम दिलासा म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना हरित सेतू प्रकल्पाचे काम तात्पुरते थांबवण्याचे तोंडी आदेश दिले. संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच महापौरांनी लवकरच प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन प्रकल्पाचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नागरिकांसमवेत पुन्हा एक बैठक आयोजित करून पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीदरम्यान आणखी एक बाब समोर आली. काही नगरसेवकांनी आठवडाभरापूर्वी महापौरांनी स्थगित केलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची विनंती केल्याची माहिती बैठकीत उघड झाली. आंदोलनाच्या वेळी नागरिकांसोबत उपस्थित राहून पाठिंबा दर्शवणारे काही लोकप्रतिनिधीच नंतर प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

हरित सेतू प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्टपणे नागरिकांसमोर मांडावी आणि सर्व संबंधितांसोबत बैठक घेऊन गैरसमज दूर करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या बैठकीला माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांच्यासह एनपीआरएफ (NPRF) फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शिंदे, अर्जुन दलाल, विजय नाईक,अतुल भोंडवे, प्रतिभा जोशी दलाल, धनंजय काळभोर,विलास कुटे, चंद्रकांत कोठारी, झिशान सय्यद, विजय शेटे,बाळा दानवले, रवींद्र हिंगे, योगेश शिंदे, पुनम शिंदे, नितीन कुंभार, सूर्यकांत मुथीयान, अश्विन खरे, शंतनू पेंडसे, सुनील पाटील, दिलीप मोरे आणि संतोष काळभोर.