हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी

0
7

दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत

दोन सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण

मुंबई, दिनांक २४ – राज्यभरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंतर्गत ठिकठिकाणी १६ हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबर्डा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर – सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज उपलब्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. पंपांना वीज पुरवठा करणारे सर्व कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० अंतर्गत काम सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर चालविण्यात येतील.

या कार्यक्रमाला उंबर्डा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्यातील उंबर्डा येतील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची क्षमता ४ मेगावॅट आहे. या प्रकल्पामुळे १७११ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. धाराशीव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील प्रकल्प २ मेगावॅट क्षमतेचा आहे. एकूण ८४५ शेतकरी या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. वाशिम आणि धाराशीव जिल्ह्यातील एक – एक सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प यापूर्वीच सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेतील पहिल्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत राज्यात नोव्हेंबर अखेर १५,७०८ मेगावॅट क्षमतेचे सौर वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ६६९ मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यामधून १,३०,४८६ शेतकऱ्यांना दिवसा आठ तास थ्री फेज वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

राज्यात शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा आणि रात्री अशा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना केवळ दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करावा अशी अनेक दशकांची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यभरात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून विकेंद्रीत स्वरुपात कृषी फीडर्सना विजेचा पुरवठा करण्यात येईल. त्यातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल तसेच या योजनेत किफायतशीर दरात वीज मिळाल्यामुळे राज्य सरकारचे अनुदान आणि उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होईल.