हरातील उद्यानांमधील सोयी सुविधांवर महापालिका देणार भर

0
317

-आयुक्त शेखर सिंह यांचे आश्वासन; दुर्गा टेकडी उद्यानाला दिली अचानक भेट

पिंपरी,२६ एप्रिल २०२३ : उद्यानांचे शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण करण्यावर महापालिका भर देत आहे. सकाळी मॉर्निग वॉक आणि स्वच्छ हवा मिळावी, यासाठी शहरातील उद्यानांमध्ये येणा-या नागरिकांसाठी महापालिकेमार्फत नागरी सोयीसुविधा उभारून चांगली सेवा देण्यात येईल, असे आयुक्त्‍ शेखर सिंह यांनी नागरिकांना आश्वासित केले. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दुर्गादेवी टेकडी उद्यान येथे आज सकाळी अचानक भेट दिली.त्याभेटी दरम्यान दुर्गादेवी टेकडी येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांबरोबर शहरातील पर्यावरण, नागरी सुविधा अशा विविध विषयांवर संवाद साधला.

नागरिकांनी देखील आयुक्तांसमोर विविध समस्या मांडून त्यावर चर्चा केली. महापलिका प्रशासन आणि नागरीक यांच्यातील संवाद दृढ व्हावा तसेच प्रशासनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी ही भेट देण्यात आली. यावेळी उद्यान विभागप्रमुख रविकिरण घोडके यांच्यासह उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दुर्गादेवी टेकडी येथे येणाऱ्या नागरिकांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. त्यामध्ये दुर्गादेवी उद्यानाची सद्यस्थिती, पाणीपुरवठा, रंगरंगोटी, ओपन जिम इत्यादी बाबींसंदर्भात सूचना करण्यात आल्या. शहरातील पार्किंग व्यवस्था, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था, सौरऊर्जा, शहर स्वच्छता व नागरिक सहभाग अशा विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. तसेच, प्रत्यक्ष पाहणी करून अधिका-यांना सूचना केल्या.

प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. नागरिकांनी आयुक्तांना या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन या मोहिमेमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी दुर्गादेवी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. महानगरपालिका आयुक्तांना भेटण्याची संधी मिळून त्यांच्यापुढे विविध प्रश्न मांडता आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात देखील महापालिकेच्या प्रकल्पांना अशाच प्रकारे भेटी देण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.