मुंबई, दि. १४ (पीसीबी) – लोकसभेच्या तिकिटासाठी नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं बोललं जात आहे. तसेच वेळोवेळी नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी भाजपच्या बाजूनेच भूमिका घेतलेली आहे.आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने जोर धरला होता. अशात नवनीत राणांचा मात्र अपेक्षाभंग झाल्याचं दिसत आहे. कारण भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नवनीत राणांचं नाव नाही. यामुळे राणांचं टेंशन वाढलं आहे. दरम्यान, जात दाखल्याच्या प्रकरणात नवनीत राणा पूर्ण अडचणीत असल्याने तसेच सर्वेक्षण अहवाल त्यांच्या विरोधातील असल्याने भाजपने त्यांना पक्ष प्रवेश आणि उमेदवारी दिलेली नाही, अशी चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकांची चाहूल लागताच नवनीत राणा यांनी आगामी निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवण्याचे जाहीर केलं होतं. मात्र आमदार रवी राणा मात्र भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर विचार करू, असं म्हणाले होते.भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नवनीत राणा यांना स्थान देण्यात आलेले नाही. याचवेळी भाजपने राज्यात पाच महिलांना उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती मतदारसंघाच्या नवनीत राणा यांचं नाव नाही. या यादीत महाराष्ट्रातील पाच महिलांचा समावेश आहे.पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. जळगाव येथून पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.