हनी ट्रॅपमध्ये अडकवून बँकेच्या उपव्यवस्थापकाला मागितली ५ लाखाची खंडणी

0
183

पुणे, दि. १० (पीसीबी)-हनी ट्रॅपमध्ये अडकवून बँकेच्या एका उपव्यवस्थापकाला ५ लाखाची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका तरुणीच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका ३२ वर्षीय तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रीती देशपांडे उर्फ प्रीती गहांदुळे (वय. ३०, रा. नवी मुंबई कळंबोली ) हिच्यावर गुन्हा दाखल केला. सदर प्रकार हा जून २०२१ पासून आजपर्यंत सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेचा उपव्यवस्थापक व प्रीती देशपांडे यांची ओळख एका स्टार मेकर या ऑनलाइन ॲपद्वारे झाली होती. त्यानंतर आरोपी प्रीतीने उपव्यवस्थापक जाळ्यात ओढले. त्यानंतर प्रीतीचे उपव्यवस्थापक यांच्या कल्याणीनगर येथील घरी येणे-जाणे सुरू झाले.

दरम्यान, २७ डिसेंबर २०२२ रोजी प्रीती फिर्यादी उपव्यवस्थापकाच्या घरी आली. घरासाठी ५ लाख रुपये दे, नाही तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार देईल. आणि तुला व तुझ्या घरच्यांना गुन्ह्यात अडकवून टाकेन, व मी आत्महत्या करेल, अशी धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.