बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन सुनावणी दरम्यान एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तब्बल ३२ मिनिटांचा सखोल युक्तिवाद सादर करत आरोपींनी देशमुख यांना कशा प्रकारे क्रूरपणे ठार मारले, याचे तपशीलवार वर्णन केले. हत्या करताना आरोपी हसत होते, असेही युक्तिवादात स्पष्ट करण्यात आले.
उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात मांडलेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास संतोष देशमुख यांचे बीड रोडवरील उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. हत्या इतकी भयानक होती की, तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आरोपींच्या निर्दयीपणाचा अंदाज सहज येतो, असे निकम यांनी नमूद केले.
हत्या करताना आरोपी हसत होते, ते आनंद घेत होते, अशा प्रकारचे दृश्य व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. “आमच्यावर काहीच होणार नाही, आमच्यावर आधीपासूनच केसेस आहेत,” अशी गर्विष्ठ वक्तव्ये आरोपी करत होते, असाही गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
चार्ज फ्रेमसाठी केस पूर्णपणे तयार असल्याचा दावा
निकम यांनी युक्तिवादात सांगितले की, या प्रकरणात फक्त खंडणी नव्हे तर पूर्वनियोजित कट, धमकी, ब्लॅकमेलिंग आणि खून या सर्व घटकांचा समावेश आहे. त्यामुळे चार्ज फ्रेम तयार करण्यासाठी सर्व पुरावे, व्हिडिओ, फोटो, कॉल रेकॉर्डिंग, टॉवर लोकेशन यांसारख्या गोष्टी सादर करण्यात आल्या आहेत.
या युक्तिवादातून हे प्रकरण केवळ खंडणीपुरते मर्यादित नसून, एक नियोजित आणि गुन्हेगारी मनोवृत्तीचा नमुना असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे आरोपींची मोकळ्या मनाने केलेली हिंसा, त्यातील आनंद आणि कोणतीही भीती न वाटणारा वृत्ती ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे निकम यांनी न्यायालयासमोर मांडले.