हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स

0
308

झारखंड, दि. ८ (पीसीबी) – केंद्रीय अन्वेषण एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मंगळवारी (८ ऑगस्ट) समन्स पाठवले. जमीन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सीएम सोरेन यांच्यावर सुमारे १,००० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने सोरेनचा जवळचा सहकारी पंकज मिश्रा याला यापूर्वीच अटक केली आहे. आता याप्रकरणी सोरेन यांना १४ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
रांचीमध्ये लष्कराने ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या संदर्भात कर आयुक्तांनी सरकारला अहवाल सादर केला होता. बनावट नाव आणि पत्त्याच्या आधारे लष्कराच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे या अहवालात म्हटले आहे. याबाबत रांची महापालिकेने तक्रार दाखल केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये व्यापारी विष्णू अग्रवाल, अमित अग्रवाल यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते, ज्यामध्ये ईडीला अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली होती.

आता १३ जणांना अटक
१८ नोव्हेंबर २२ रोजी सोरेन यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सुमारे १० तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रांचीचे माजी उपायुक्त छवी रंजन, कोलकाता येथील व्यापारी अमित अग्रवाल, न्यूक्लियस मॉलचे मालक आणि व्यापारी बिष्णू अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.

८ जुलै २२ रोजी मुख्यमंत्र्यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. यामध्ये ईडीला सीएम हेमंत सोरेन यांच्या बँक खात्याशी जोडलेले चेकबुक मिळाले. यानंतर त्यांचे नाव या प्रकरणात जोडले गेले. आता ईडीने त्याला १४ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले आहे.