पिंपरी, 1 ऑगस्ट (पीसीबी) – आखाड महिना चालू आहे त्यात पावसाचा जोर ही काही कमी होईना. पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत, नागरिकांना इजा होत आहे.पण या खड्ड्यांकडे ना प्रशासनाचे ना राजकीय नेत्यांचे लक्ष. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती शिवसेना- शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी- अजित पवार गट यांचे अप्रत्यक्षरीत्या नियंत्रण आहे.पण एकंदरीत खड्ड्यांकडे केलेले दुर्लक्ष पाहता शहराकडे कोणत्याही नेत्याचे लक्ष नाही असेच चित्र दिसत आहे.
त्यात अनेक राजकीय नेत्यांकडून आखाड पार्टीचे जोरदार नियोजन सुरू आहे. पण या आखाड पार्टीला जायला खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहे हे राजकीय नेते विसरले असावेत. पिंपरी चिंचवडकरांना आखाड पार्टीपेक्षा रस्त्यावरील खड्डे महत्त्वाचे वाटतात आणि ते लवकरात लवकर बुजवले जावेत अशी नागरिकांची मागणी होत आहे.याच प्रश्नाकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी आयुक्तांना पत्र लिहून लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
खड्ड्यांसाठी अगदी हजार कोटीचे टेंडर जरी काढले तरी एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही ना आंदोलन करणार ना त्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार. आमच्यासाठी पैशांपेक्षा खड्डे बुजवणे हे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे एखादा अपघात कमी होऊ शकतो आणि पिंपरी चिंचवडच्या एखाद्या नागरिकाचा जीव वाचू शकतो. आमच्यासाठी प्रत्येक पिंपरी चिंचवडकराचा जीव हा हजार कोटी रुपयांच्या समान आहे असे माधव पाटील या निवेदनात म्हणतात.माधव पाटील यांनी हे निवेदन एक्स या समाज माध्यमातून आयुक्तांना पाठवले आहे. आतायावर आयुक्त किती लवकर कारवाई करतात याकडे सामान्य माणसांचे लक्ष लागले आहे.