हजारोंनी राजकीय फलक, होर्डिंग्ज काढायचेत

0
221
  • आचारसंहिता लागू झाल्याने महापालिका प्रशासनाची तारांबळ

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकिसाठी आदर्श आचारसंहिता आज दुपार पासूनच लागू झाल्याने शहरातील सर्व राजकीय फलक, होर्डिंग्ज, नेत्यांचे नामफलक काढण्यासाठी महापालिका प्रशासनाची प्रचंड धावपळ सुरू आहे. येत्या २४ तासात शहरातील सर्व राजकीय फलक काढण्याचे आदेश दिल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पीसीबी टुडे प्रतिनिधीला सांगितले.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेचा समावेश होतो. शहरातील बहुसंख्य चौक, रस्ते, गल्लोबोळांतून राजकीय नेत्यांचे फलक लागलेले आहेत. वाढदिवसानिमित्तचे होर्डिंग्ज तसेच रस्त्यावरील विजेच्या खांबावर क्युआँक्स म्हणजे लटकणारे छोट्या पाट्या हजारोंनी आहेत. भाजपने शहरभर फलक रंगवलेले आहेत. मोदी सरकारच्या कार्यक्रमाचे फलक आणि जाहीरातपत्रके जागजागी आहेत. आजी-माजी नगरसेवक, आमदार, खासदार तसेच विविध समिती सदस्य, पक्षांचे पदाधिकारी यांच्या नावांच्या घर दर्शविणाऱ्या पाट्या जागोजागी आहेत. सुमारे दोनशे चौरस किलोमीटरच्या या शहरात असे हजारो फलक, पाट्या आढळतात. नेत्यांचे पुतळेसुध्दा अनेक चौकांतून आहेत. आज शनिवारची सुट्टी असल्याने हे सर्व फलक, पाट्या त्वरीत काढणे अपेक्षित आहे.

निवडणूक आयोगाची प्रेस संपताच कारवाई सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सायंकाळी आयुक्तांनी एक बैठक घेऊन त्याबाबतचे आदेश दिले. आता आज आणि उद्या सायंकाळ पर्यंत हे सर्व फलक, नामफलक, होर्डिंग्ज काढले जाणार आहेत. आयुक्त सिंह यांनी प्रशासनातील आठही प्रभागांच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश दिले.