स्व.दिगंबर (दादा) भेगडे स्मारकाचे उदघाटन

0
325

तळेगाव दाभाडे, दि. २८ (पीसीबी) – मावळचे (जि.पुणे)सलग दोन टर्म (१९९९,२००४) भाजप आमदार राहिलेले स्व.दिगंबर (दादा) भेगडे हे सांप्रदायिक क्षेत्रातील असल्याने ते निवडून आल्यावर पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी अशी घोषणा त्यावेळी गाजली होती.हा संदर्भ ध्य़ानात घेत पंढरीचा हा वारकरी विधानसभेत वारकरीच राहिला,मानकरी झाला नाही,अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिगंबरदादांच्या प्रथम पुण्यस्मरण आणि मावळातील कुंडमळा येथील त्यांच्या स्मारकाच्या उदघाटनानंतर आज (ता.२७) व्यक्त केली.

सुखदुखात फिरणारा आमदार म्हणून ओळखले जाणारे दिगंबर भेगडे हे दुसऱ्यांदा २००४ ला आमदार झाले,तेव्हा डॉन अरुण गवळी हा ही भायखळ्यातून विधानसभेवर निवडून गेला होता. त्यावेळी भर विधानसभेत गवळीने त्यांचे पाय धरले. ते पाहून संपूर्ण सभागृह चकित झाले होते. गेल्यावर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचा पहिला स्मृतीदिन आणि कुंडमळा या त्यांच्या गावी उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमाला अत्यंत बिझी शेड्यूलमधून देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी वेळ काढला. खास हेलिकॉप्टरने ते मावळात आले. दिगंबरदादांना आदरांजली वाहून ते अकोला आणि मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर येथील कार्यक्रमाला विमानानेच रवाना झाले.

आपल्या आटोपशीर मनोगतात फडणवीसांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.दादांनी नेहमी मूल्याधिष्ठीत राजकारण केले. आपले काम नसतानाही ते विधानसभेत पूर्ण वेळ बसून राहत. विषय अशा पद्धतीने ते मांडत की मंत्र्यांना त्याची दखल घ्यावीच लागत होती,असे फडणवीस म्हणाले.शेतकऱ्यांच्या पेहरावात १९९९ ला दादांची आमदार म्हणून पहिली भेट झाली. दहा वर्षात ते स्वत:चे काम म्हणून कधी घेऊन आले नाहीत.अशी माणसे विरळ झाली आहेत,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आमदार नसतानाही ते मुलभूत समस्या घेऊन येत होते,हे त्यांनी आवर्जून नमूद सांगितले.कोळशाच्या खाणीतील निष्कलंक हिरा असे पक्षाचे स्व. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे त्यांना म्हणायचे याची आठवणही फडवीसांनी यावेळी सांगितली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मावळचे शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपच्या विधान परिषद सदस्या उमा खापरे, आमदार राहुल कुल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे तसेच रवींद्र भेगडे यावेळी उपस्थित होते