दि . 12 ( पीसीबी ) पुणे : स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने पुण्यासह राज्यभरातील वातावरण तापलं. आता या प्रकरणातील पीडित तरुणीने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून पीडीतेने विशेष सरकारी वकील म्हणून ऍड असीम सरोदे यांची नियुक्ती करावी अशी मागणी देखील केली होती.मात्र तरुणीने अर्ज देण्यास उशिर केल्याचं स्पष्टीकरण पुणे पोलिसांकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरकारी वकील कोण असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्तावर सरकारकडे दाखल झाला आहे. पुणे पोलिसांकडून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र अजय मिसर यांच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आता पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांना नियुक्त करावं अशी मागणी करण्यात आल्यानंतर अर्ज देण्यास उशीर केल्याचं स्पष्टीकरण पुणे पोलिसांकडून देण्यात आल आहे. त्यामुळे आता एकीकडे पोलीस प्रशासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज शेवटची तारीख आहे. पोलिसांनी दरम्यानच्या काळात गाडेची कसून चौकशी केली.मात्र गाडेने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता त्याचा मोबाईल जप्त करण्याची प्रक्रिया पोलीस करत आहेत. त्याच्या मोबाईल मधून अनेक गोष्टी समोर येतील असा पोलिसांना संशय आहे.आता या प्रकरणात न्यायालय कोणता नवा आदेश देणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.