दि. १४(पीसीबी)-स्वामी विवेकानंद मराठी शाळा, काळभोर नगर (महापालिका शाळा) येथे विद्यार्थ्यांसाठी अवकाश शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामागचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच अवकाशविषयी कुतूहल, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा होता. भविष्यातील राकेश शर्मा किंवा सुनीता विलियम्स यांच्यासारखे संशोधक घडावेत, यासाठीचा हा सकारात्मक प्रयत्न होता.
कार्यक्रमात टेलिस्कोपचे प्रकार, सूर्यमाला, ब्लॅक होल, सध्याचे अवकाशातील तंत्रज्ञान यांची माहिती दिली गेली. त्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवून विज्ञान अधिक सुलभ आणि रंजक पद्धतीने समजावून सांगण्यात आले.
या वेळी अवकाशतज्ञ तेजस काळे (लेखक: Infinity Beyond Space) यांनी हसत-खेळत आणि संवादात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सादरीकरणाने शिबिर अधिकच प्रभावी ठरले.
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन धनराज काळभोर यांनी केले होते. याच वेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले. शाळा आणि पालिकेच्या वतीने या अभिनव उपक्रमाचे उपस्थित पालक आणि शिक्षकांनी कौतुक केले.