पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी शहरातील प्राधिकरण बाधित कष्टाच्या पैशातून घेतलेल्या सर्वसामान्यांच्या घरासाठी त्यांच्या प्रॉपर्टी कार्ड व मालकी हक्कासाठी लढणाऱ्या,स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या समन्वयकांची बैठक सोमवारी (दि. 22) थेरगाव येथील समन्वयक धनाजी येळकर पाटील यांच्या निवासस्थानी झाली.
बैठकीमध्ये महापालिकेची निवडणूक थेरगाव प्रभाग क्रमांक 23 आणि प्रभाग 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर बिजलीनगर या दोन प्रभागात लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये समविचारी डावे लोकशाही, पुरोगामी पक्ष, सामाजिक संघटना यांच्या सोबतीने ही निवडणूक लढवली जाणार आहे.
४० वर्षापासून रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, बिजलीनगर येथील नागरिक आपल्या घराच्या मालकी हक्कासाठी लढत आहेत. याच प्रश्नाचे राजकारण येथील नेत्यांनी करत येथील आमदार, खासदार सत्तेत आले पण प्रश्न मात्र सोडवला नाही. उलट नवीन प्रारूप विकास आराखड्याच्या नावाखाली रस्ते व इतर आरक्षणे नागरिकांच्या घरावर टाकून येथील नागरिकांना बेघर करण्याचा घाट येथील लोकप्रतिनिधींनी घातला आहे.
हे मूलभूत प्रश्न न सोडवता जनतेच्या आणखी अडचणी या सत्ताधारी फडणवीस सरकार कडून वाढवल्या जात आहेत.
वारंवार होत असलेली या नागरिकांची फसवणुक टाळण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपला हक्काचा प्रतिनिधी सभागृहात असणे आवश्यक आहे. म्हणून स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या वतीने ही निवडणूक लढवली जाणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही पक्षाच्या गटांना शहरातील नागरिकांच्या घरा सारख्या मुलभूत प्रश्नाविषयी कुठलेही गांभीर्य नाही. केवळ सत्ता मिळवणे आणि सत्ता प्रस्थापित करून त्या आधारे भ्रष्टाचार करणे एवढ्या उद्देशानेच हे पक्ष निवडणूक लढत आहे.कोणती वैचारिक निष्ठा नाही,कोणताही सामाजिक ठोस कार्यक्रम नाही, शहराच्या विकासाबद्दलचे कुठलेही उद्दिष्ट नाही. केवळ इच्छुक उमेदवाराकडे किती पैसा आहे,तो कोणत्या स्थानिक कुटुंबातून येतो, हे पाहूनच या दोन्हीही प्रस्थापित आघाड्या उमेदवारांना उमेदवारी देत आहेत.पण शहरातील मूलभूत प्रश्न तसेच आहेत.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, शहराच्या विकासाच्या बाबतीत गांभीर्याने काम करण्यासाठी, शहर भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकावी यासाठी म्हणून स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने ही डाव्या व लोकशाहीवादी,पुरोगामी पक्ष संघटनासोबत ही निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे.
या प्रभागातील उमेदवार दोन दिवसात जाहीर करण्यात येतील. असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीस छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे समन्वयक धनाजी येळकर पाटील, शिवाजी इबितदार, गौरव धनवे,मनोज पाटील, देवेंद्र भदाणे नंदकुमार नायकुडे,नागेश भंडारी, रामचंद्र ढेकळे,अर्चना मेंगडे,रवींद्र दळवी, सूर्यकांत इबीतदार,राजू पाटील, शशिकांत आवटे,संतोष ढवणे, मैनुद्दीन शेख,दत्तात्रय पोखरकर, हरिश्चंद्र धोत्रे, रामलिंग तोडकर हे समन्वयक उपस्थित होते.














































