स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांचेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य

0
2

पिंपरी, दि. १६ श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी यांच्यावतीने विश्वस्त अनिल सौंदडे यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्य दिनी विविध शाळेच्या आर्थिक दुर्बल घटकातील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना मिळून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. गेली तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. या वर्षी आदर्श बालक मंदिर – बिजलीनगर, जयवंत प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय – दळवीनगर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे खिंवसरा पाटील शिक्षण संकुल – थेरगाव, बाल विकास शिक्षण संस्था – कुर्ला मुंबई या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक अर्थसाह्य देण्यात आले. याप्रसंगी ‘महाराष्ट्राचे कुलदैवत साक्षात श्री खंडोबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही शिक्षणात गरुडभरारी घेऊन देशाचे जबाबदार व कर्तव्यनिष्ठ नागरिक बनावे आणि आपल्या कुटुंबाच्या विकासासह राष्ट्रउभारणीच्या कामात योगदान द्यावे!’ , असे भाऊसाहेब भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते व लोक कलावंत आसराम कसबे यांनी या योजनेचा पाठपुरावा केला.