स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या महापुरुषांचाच महापालिकेला विसर ?

0
339

महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर कित्येक वर्षांपासून पडून असलेले “महात्मा गांधीजी यांचे स्मारक” तातडीने उभारण्याची मागणी

भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांची आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी

पिंपरी दि.१४ (पीसीबी) – स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा सन्मान राखला पाहिजे परंतु कित्येक वर्षांपासून स्मारकासाठी आरक्षित असणारा हा भुखंड धूळखात पडून आहे, तरी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत याठिकाणी स्मारक उभारण्याची कार्यवाही तातडीने करून लवकरात लवकर हे स्मारक उभारण्याची मागणी भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

किशोर हातागळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, “महानगरपालिकेपासुन अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मोरवाडी पिंपरी येथील महात्मा गांधीजी यांच्या स्मारकासाठी आरक्षित असणारा भुखंड कित्येक वर्षापासुन असाच पडून आहे, हा आरक्षित भुखंड महापालिकेच्या ताब्यात असुनही या जागेवर आतापर्यंत पुतळा व स्मारक का बनविण्यात आले नाही? हा प्रश्नच आहे.

शहरात सर्व महापुरुषांचे स्मारक आणि पुतळे उभारले आहेत, प्रत्येक महापुरुषांच्या जयंती व स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करून पुढच्या पिढीला इतिहासाची उजळणी करून त्यांचा कार्याचा यथोचीत सन्मान राखला जातो यासाठी शहराचे नावलौकिक आहे पण देशासाठी अहिंसात्मक मार्गाने बलिदान देऊन देश स्वातंत्र्य करण्यात मोठं योगदान देणारे महात्मा गांधीजीचा आपल्या महापालिकेला विसर का? क्रांतिकारी ज्या प्रकारे देशासाठी लढले आणि आपल्या प्राणाची आहुती देत शहिद झाले त्याचप्रकारे गांधीजींनी ही भारत देशासाठी अहिंसेच्या मार्गाने यशस्वी लढा दिला, सत्याग्रह, मोर्चे, आंदोलने करत इंग्रजाविषयी बंड पुकारले होते, उद्या १५ ऑगस्ट ‘स्वातंत्र्य दिन” देशात सगळीकडे आपला तिरंगा राष्ट्रध्वज फडकवुन मोठ्या देशभक्तीने आणि अभिमानाने आपण हा सण साजरा करतो.

पण देशासाठी लढणाऱ्या महापुरुषांचा आपल्याला अशाप्रकारे विसर पडणे लज्जास्पद आणि निंदनीय आहे, पिंपरीतील स्मारकासाठी राखीव असणाऱ्या या भुखंडावर आता गवत आणि मोठमोठी झाडेझुडपे उगवली आहेत, आजूबाजूचे नागरिक याठिकाणी लघुशंकेसाठी जाऊन याठिकाणचे पावित्र्य भंग करत आहेत, तरी आपण याची गांभीर्याने दखल घेऊन महात्मा गांधीजी यांचा पुतळा व स्मारक तातडीने बनविण्यासाठी आदेश प्रशासनाला द्यावेत व सदर ठिकाणची स्वच्छता व सुरक्षेसाठी तेथे तात्काळ सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी” असे त्यात नमुद केले आहे.