स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहर काँग्रेसचे ७५ किलोमीटरची पदयात्रा

0
282

आझादी गौरव पदयात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे – डॉ. कैलास कदम

पिंपरी,दि. ८(पीसीबी) – भारत मातेच्या यावर्षीचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले. या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघ मिळून ७५ कि. मी. ची आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती माजी महापौर व ज्येष्ठ नेते कविचंद भाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष डाॅ. कैलास कदम, ज्येष्ठ नेते अशोक मोरे, तानाजी काटे, माजी नगरसेविका निगार बारस्कर, माजी नगरसेवक बाबू नायर, महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवा दल शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष अॅड. उमेश खंदारे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मालशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितुले, डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, भाऊसाहेब मुगुटमल, अर्जुन लांडगे, मेहबुब शेख, चक्रधर शेळके, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे विशाल सरवदे, आशा भोसले, धनाजी गावडे, अण्णा कसबे, उमेश बनसोडे, पांडुरंग जगताप, मिलिंद फडतरे, छायावती देसले, चंद्रकांत काटे, रवी कांबळे, किरण खाजेकर, किरण नढे, आकाश शिंदे, विजय ओव्हाळ, जुबेर खान आदी उपस्थित होते.

यावेळी अधिक माहिती देताना शहराध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांनी सांगितले की, ९ ऑगस्ट क्रांती दिन ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या कालावधीत शहर काँग्रेसचे सर्व माजी महापौर, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, इंटक, एनएसयुआय आणि सर्व विभाग व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभाग घेणार आहेत.

पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात प्रत्येकी साधारणता २५ किमी ची पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेची सुरवात क्रांती दिनाच्या दिवशी मंगळवारी (दि. ०९ ऑगस्ट) पिंपरी विधानसभा मतदार संघातील पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी येथील शहिद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आझादी गौरव पदयात्रेस सुरवात करण्यात येणार आहे. दापोडी परिसर, फुगेवाडी, कासारवाडी परिसरात ही यात्रा काढण्यात येणार आहे.

तसेच सायंकाळी ५ वाजता पिंपरी कॅम्प, येथून पुन्हा ही पदयात्रा सुरू होईल. त्याच प्रमाणे चिंचवड, भोसरी विधानसभा मतदार संघातही नियोजित वेळापत्रकानुसार राष्ट्र पुरूषांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरवात करण्यात येणार आहे. या पदयात्रेचे नेतृत्व त्या त्या भागातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनिक व काँग्रेस पदाधिकारी करणार आहेत. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान सकाळी व संध्याकाळी निघणा-या आझादी गौरव पदयात्रेमध्ये परिसरातील बालगोपालासह, विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनिक, कामगार बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांनी केले.

तसेच या पदयात्रेचा समारोप सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८:३० वाजता चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर चौक येथे ७५ मशाली प्रज्वलीत करून व क्रांतिकारकांना अभिवादन करून करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट सोमवारी मध्यरात्री १२:०५ मिनिटांनी क्रांतिवीर चापेकर चौक येथे राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच ७५ स्वातंत्र्यसेनिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.महिला काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांनी सांगितले की, या पदयात्रेत महिला काँग्रेसच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या घालून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनिकांचे औक्षण करून सर्व महिला या पदयात्रेमध्ये सहभागी होतील.युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी सांगितले की, या पदयात्रेत सहभागी होणा-या देशप्रेमीसाठी आवश्यक असणारी सेवा सुविधा पुरविण्यात येईल.

माजी नगरसेवक बाबू नायर यांनी आवाहन केले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रीय काँग्रेसचे तात्कालिन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह कश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई या विविध धर्मातील विविध जाती व पंथातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. या स्वातंत्र्य लढ्यात हजारो नागरिकांनी बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात अशा सर्व शहिद योद्ध्यांना, नागरिकांना पदयात्रा सुरू होताना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. या पदयात्रेत सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवावे असे आवाहन माजी नगरसेवक बाबू नायर यांनी केले.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर यांनी सांगितले की, समारोपाच्या दिवशी सर्व धर्मिय धर्मगुरू राष्ट्रीय एकात्मतेची शपथ उपस्थितांना देतील आणि सर्व धर्मिय प्रार्थना पठण करतील. या देशप्रेमी आनंदी सोहळ्यात सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असेही आवाहन निगार बारसकर यांनी केले.