पिंपरी, दि.१४ (पीसीबी) – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे. शहरातील लोकप्रतिनिधी, माजी नगरसदस्य, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
याशिवाय, महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या हस्ते, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या हस्ते, औद्योगिक प्रशिक्षण विभागामध्ये संस्थेचे प्राचार्य तर विभागीय कार्यालयांमध्ये संबंधित शाखाप्रमुख यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे.
भक्ती शक्ती येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी, १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता निगडी येथील भक्ती शक्ती चौकात “झेंडा उंचा रहे हमारा” हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीरांची देशभक्ती, त्याग आणि समर्पण कार्याची आठवण करून देत क्रांतिकारकांना देशभक्तीपर गीतांतून अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
“अंदाजपत्रकात नागरी सहभाग” उपक्रम
पिंपरी चिंचवड महापालिकेचा “अंदाजपत्रकात नागरी सहभाग” हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत मागील वर्षी नागरिकांनी सुचवलेल्या ४९९ कामांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला होता. या वर्षी देखील हा उपक्रम राबवण्यात येत असून १५ ऑगस्ट २०२५ रोजी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांना नवीन प्रकल्प, योजना आणि विविध कामे सुचविता येणार आहेत.