आरोपींना कठोर शिक्षेसाठी महिलांची जोरदार घोषणाबाजी; पोलिसांची झाली दमछाक
खेड दि.१४ (पीसीबी)- आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने रविवारी (१० जुलै) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली होती. लग्नातील उर्वरित फर्निचर व इतर वस्तुसाठी नवरा, सासु व सासरे प्रियंकाला मानसिक व शारीरिक छळ करत असल्यानेच ही घटना घडली असून त्यांच्याविरोधात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना अटक करून त्यांना आज खेड न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी निगडीतील शेकडो संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रियांकाला न्याय मिळण्यासाठी व आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी आक्रमक झाल्या यावेळी पोलिसांची मोठी दमछाक झाली.
प्रियंका अभिषेक उमरगेकर (वय अंदाजे २२) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. प्रियंका उमरगेकर या आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सूनबाई होत्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कमल बापु घोलप यांची ती मुलगी आहे, विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वीच प्रियंका यांचे लग्न झाले होते. आणि लग्नात घोलप परिवाराने लाखो रुपये खर्च करत मुलीच्या सुखासाठी व उमरगेकराच्या मागणीवरून महागडी चारचाकी व दुचाकी गाडी घोलप यांनी दिली होती, परंतु उर्वरित फर्निचर व वस्तुसाठी उमरगेकर कुटूंबीय प्रियांकाचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत होते व त्यातुनच प्रियांकाला आपला निष्पाप जीव गमवावा लागला, ही आत्महत्या नसुन तिचा खुन करण्यात आला यास तिचा नवरा व सासु सासरे हेच जबाबदार असुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी रीतसर तक्रार प्रियंकाच्या आई वडिलांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
आज खेड न्यायालयात आरोपी उमरगेकर कुटुंबियांना हजर केले असता निगडीतील शेकडो संतप्त महिलांनी थेट खेड न्यायालय गाठत आरोपींच्या अंगावर धावुन जात जोरदार घोषणाबाजी केली, “निष्पाप प्रियांकाला न्याय द्या न्याय द्या, आरोपींना कडक शिक्षा द्या” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला, पोलिसांनी आरोपींच्या सुरक्षेची जबाबदारी घेत महिला पोलिसांची ज्यादा कुमक मागवुन घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.