दि.२०(पीसीबी) – वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि गीत फुलोरा निर्मित ‘चैत्रपाडवा’ गीताचे लोकार्पण कस्पटेवस्ती सकल हिंदू संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी करण्यात आले. गुढीपाडव्या निमित्त सकल हिंदू संमेलनाचे कस्पटेवस्ती वाकड, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतुल अग्निहोत्री, ह.भ.प. महादेवमहाराज भुजबळ, सुधीर आयाचित, संतोष कस्पटे, संदीप चिलेकर यांच्या शुभहस्ते विराट हिंदू संमेलनामध्ये सादरीकरणासह या गीताचे लोकार्पण करण्यात आले.
“शुभारंभ करी शक गणनेचा
करुनी पराभव दुष्ट जणांचा
शालिवाहन नृपती आठवा
चैत्र मासीचा गुढीपाडवा…”
कवयित्री मंगला गोखले यांच्या ह्या गीतास अभयार्पिता यांनी संगीतबद्ध केले असून अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी आणि भाग्यदा यांनी या गीताचे गायन केले आहे. लोकार्पणानंतर स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी वाकड आणि पुनावळे येथील विद्यार्थ्यांनी या गीताचे सादरीकरण केले. मराठमोळ्या पोशाखातील सादरीकरणाला सर्वांची उत्स्फूर्त दाद लाभली .
हे गीत गीत-फुलोरा यूट्यूब चैनल वर उपलब्ध असून सर्वांनी जरूर ऐकावे, असे आवाहन या गीताचे संगीतकार आणि गायक अभयार्पिता यांनी केले आहे. अतुलची अग्निहोत्री आणि ह.भ.प. महादेवमहाराज भुजबळ यांनी या औचित्यपूर्ण गीताच्या निर्मितीबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संयोजक संतोष कस्पटे आणि संदीप चिलेकर यांनी या गीतास भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ह्याच कार्यक्रमामध्ये अभयार्पिता यांनी संगीतबद्ध केलेले आठ भाषेतील हिंदू ऐक्य गीत, संपूर्ण वंदे मातरम् गायले. पिंपरी – चिंचवड सन्मानप्राप्त अथर्व कुलकर्णीने “गणनायकाय…” गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. नगरसेवक संदीप कस्पटे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला, आबालवृद्ध सर्वांची भरभरून उपस्थिती होती.
स्वरोपासना आणि गीत फुलोरा तर्फे भारतीय संस्कृतीला पूरक अशा गीतांची निर्मिती केली जाते. या आधी मराठी भाषा दिवस, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, वंदे मातरम् १५० वर्षपूर्ती आणि श्रीराम मंदिर सोहळा निमित्ताने गीतनिर्मिती करण्यात आलेली होती.









































