स्वयंघोषित सिंघम ‘फडणवीस’ स्वतःला हनुमान, भीम, जटायू अशा अवतारात पाहतील….. ; ‘सामना’तून फडणवीसांवर बोचरी टीका

0
80

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. राज्याच्या या नव्या सिंघम साहेबांनी नालासोपारा व कोरेगावच्या बलात्काऱ्यांनाही ‘बदला’पूरचाच न्याय द्यावा. नाहीतर तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील! अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. कथा-पटकथा लिहाव्यात असे अनेक ‘खलनायक’ भाजपात आहेत. फडणवीस यांनी त्या विषयांना हात घातला पाहिजे. गृहमंत्री फडणवीस हे सिंघम, अभिमन्यू, यांच्याबरोबर कथा-पटकथाकार सलीम-जावेदही होऊ इच्छित आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यात महाराष्ट्राच्या इभ्रतीच्या चिंध्या चिंध्या झाल्या आहेत, असा हल्लाबोल सामनामधून करण्यात आला.

बदलापूरमधील शाळेतील लहान मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांकडून या एन्काऊंटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले, सरकारवर टीकाही करण्यात आली. मात्र महायुतीचे नेते, भाजप , शिंदे गटातील नेते यांनी मात्र या घटनेप्रकरणी प्रतिक्रिया देताना विरोधकांवरच टीका केली. अत्याच्याराच्या घटनेतील आरोपीचा खात्मा झाल्यावर विरोधकांच्या पोटात का दुखतंय, असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून विचारण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत विविध बॅनर्सही लावण्यात आले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा हातात बंदूक घेतलेला फोटो होता. तसेच ‘बदला पुरा’, “महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार” अशा आशयाचे काही बॅनर्स संपूर्ण मुंबईत तसेच वांद्रे येथील कलानगर परिसरातही झळकले. याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर पुन्हा टीका केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही याच मुद्यावरून सरकारला खडे बोल सुनावण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस यांनी स्वतःला ‘सिंघम’ म्हणून घोषित केले आहे. सिंघम हा चित्रपटाच्या पडद्यावर गुन्हेगारांचा वगैरे कर्दनकाळ असतो. दे मार पद्धतीने सिंघम मारामाऱ्या करतो. हवेत वगैरे उंच उड्या मारतो. या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारून गुन्हेगारांना पकडून आपटण्याचे कौशल्य त्याच्या अंगात आहे. महाराष्ट्रातील ‘स्वयंघोषित’ सिंघमने बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला मारले व महाराष्ट्रभर या सिंघमचे पोस्टर झळकले. आता या सिंघमने जाहीर केले आहे की, ‘सिंघमच्या भूमिकेतून आपण अभिमन्यूच्या भूमिकेत शिरलो आहोत व महाराष्ट्राचा अभिमन्यू मीच. मी चक्रव्यूह तोडून बाहेर येईन.’ सगळी गंमतच आहे. दोन दिवसांनी हे स्वयंघोषित सिंघम म्हणजे फडणवीस स्वतःला हनुमान, भीम, जटायू अशा अवतारात पाहतील. अयोध्येचा राजा मीच होतो असेही सांगतील. फडणवीस असे का बोलत आहेत?

कारण त्यांच्याच लोकांनी त्यांचा अभिमन्यू करून त्यांना चक्रव्यूहात अडकवले आहे. ज्या माणसाला महाराष्ट्राची कायदा, सुव्यवस्था धड सांभाळता येत नाही तो स्वतःला अभिमन्यू वगैरे असल्याचे घोषित करतो हे आक्रितच म्हणावे लागेल. काहीच धड करता येत नसल्याने ‘सिंघम’ ऊर्फ फडणवीस हे सध्या विविध भूमिका वठविणारे एक नट म्हणून वावरत आहेत. या सिंघमने बदलापूरच्या अक्षय शिंदेला मारले, पण या शिंदेचे खरे पाठीराखे आपटे, कोतवाल वगैरे लोकांपर्यंत हा सिंघम अद्यापि पोहोचू शकला नाही. शिंदेला मारल्यावर सिंघमच्या खाकी वेशात फडणवीस सर्वत्र झळकले, पण फडणवीसांपेक्षा मीच खरा सिंघम असल्याचे मुख्यमंत्री मिंधे यांनी जाहीर केले. म्हणजे आता महाराष्ट्राला दोन जुळे सिंघम प्राप्त झाले आहेत.

पुण्याचा पोलीस आयुक्त हा एक नंबरचा बकवास व ‘संघी’ विचारांचा लोचट माणूस आहे. हे महाशय आयुक्त कमी व भाजपचे हस्तक म्हणून जास्त कार्य करीत आहेत. पोर्शे कारचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यांच्या काळात पुण्यात अंमली पदार्थ, खून, भररस्त्यावर गँगवॉर, बलात्कारासारख्या गुह्यांत वाढ झाली आहे. पण सरकारचे अभय असल्याने पुण्यातील पोलीस आयुक्तांचा बाल बाका झाला नाही. सिंघम कम अभिमन्यू साहेबांनी राज्याच्या महिला वर्गालाच चक्रव्यूहात अडकवले आहे व बाहेरून भाजपचे दुर्योधन अबलांच्या पिंकाळ्यांची मजा घेत आहेत. देशाचे गृहमंत्री नाशकात असताना नाशकात बलात्कार होतात. पंतप्रधान पुण्यात येत असताना पुण्यात बलात्कार होतात. फडणवीस जेथे जातील तेथे बलात्कार व महिला अत्याचाराचे सत्र सुरूच आहे व हे सर्व रोखण्याचे सोडून गृहमंत्री फडणवीस हे आता ‘धर्मवीर-3’ चित्रपटाचे कथानक लिहायला बसणार आहेत.

महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले, वाल्मीकींनी रामायण लिहिले. आता महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. मंत्रालयाची व सरकारी बंगल्यांची या लोकांनी ‘फिल्मसिटी’ म्हणजे चित्रनगरीच करून ठेवली. कथा-पटकथा लिहाव्यात असे अनेक ‘खलनायक’ भाजपात आहेत. फडणवीस यांनी त्या विषयांना हात घातला पाहिजे.