स्वयंघोषित भाईंची थेरगाव मध्ये दहशत; एकावर खुनी हल्ला

0
74

वाकड,दि. 20 (पीसीबी)

स्वयंघोषित भाईंनी थेरगाव मध्ये दहशत निर्माण केली. एका सलून दुकानदाराला शिवीगाळ करून दुकान बंद करण्यास सांगितले. असे करू नका म्हणणाऱ्या एका व्यक्तीला दोघांनी मारहाण करून कटरने गळ्यावर वार करत खुनी हल्ला केला. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली.

भाऊसाहेब हरी दगडे (वय 37, रा. थेरगाव. मूळ रा. सोलापूर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथे दोन तरुण एका सलून दुकानदाराला शिवीगाळ करून दुकान बंद करण्यास सांगत होते. त्यामुळे फिर्यादी तिथे गेले. त्यांनी आरोपींना असे करू नका लोक घाबरतात, असे सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी ‘तू कुठला भाई आहेस. आम्ही इथले भाई आहोत. तुला माहीत नाही का मी कोणाचा माणूस आहे. मी रवी मल मामाचा भाचा आहे. तू येथून निघून जा. नाहीतर तुझी विकेट टाकू’ अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून कटरने त्यांच्या गळ्यावर वार करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.