स्वयंघोषित भाईंचा काळाखडक झोपडपट्टीत राडा

0
315

अल्पवयीन मुलाला मारहाण करून लुटले

थेरगाव, दि. २५ (पीसीबी) – स्वयंघोषित भाई आणि त्याच्या पिळवळीने १७ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. तसेच मुलाचे दागिने, पैसे जबरदस्तीने हिसकावून नेले. टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास काळाखडक झोपडपट्टी, वाकड येथे घडली.

बाळा लोखंडे (वय २५), शाहरुख खान (वय २५), आनंद वाल्मिकी (वय २७), जुबेर खान (वय २०), विष्णू कांबळे (वय २१, सर्व रा. काळाखडक, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बाळा लोखंडे आणि शाहरुख खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सागर अरुण कदम (वय १७, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर आणि त्यांचे मित्र जेवण करण्यासाठी हॉटेल मध्ये गेले होते. तिथे असलेल्या टोळक्याने सागर यांना हॉटेलच्या बाहेर ओढत नेऊन दमदाटी करत मारहाण केली. टोळक्याच्या दहशतीला घाबरून सागर यांचे मित्र पळून गेले. मी या एरियाचा शाहरुख भाई आहे. अख्खं पिंपरी चिंचवड मला घाबरतंय. तू मला नडतोय का, अशी सागर यांना धमकी देत त्यांच्या गळ्यातील ६० हजारांची सोन्याची साखळी, तीन हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.