दि. 16 ऑगस्ट (पीसीबी) – भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाली आहेत. काल स्वातंत्र्य दिन साजरा करताना शहीद या चित्रपटातले ” ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी क़सम, तेरी राहों में जाँ तक लुटा जायेंगे, फूल क्या चीज़ है तेरे क़दमों पे हम, भेंट अपने सरों की चढ़ा जायेंगे.” हे देश भक्तीपर गीत ऐकताना डोळे भरून आले. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या असंख्य वीर स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला गुलामीच्या साखळ्यांमधून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. चापेकर बंधू, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना डॉ. अबुल कलाम आझाद, स्वातन्त्र्यवीर सावरकर, यांच्या सारख्या अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपले संपूर्ण जीवन पणास लावले. या सर्व महान विभूतींनी एक समृद्ध, एकात्म, न्यायपूर्ण, प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी उपलब्ध असतील, जिथे भ्रष्टाचार, जातीयता आणि धार्मिक फूट यांना स्थान नसेल अश्या प्रगतीशील भारताचे स्वप्न पाहिले होते. परंतु आज जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा त्यांच्या स्वप्नांचे प्रतिबिंब आपल्याला दिसते का ? स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा आपल्याला विसर पडला आहे का ? आपल्या देशाबद्दलचे प्रेम कुठे गेले ? आपण खूप स्वार्थी झालो आहोत का ? आपण आपल्या देशाच्या विकासासाठी काम करण्याची जबाबदारी विसरून गेलो आहोत का ? या परिस्थितीचे कारण काय ? अश्या अनेक प्रश्नांचे कोलाहल मनात सुरु झाले.
भ्रष्टाचार आज आपल्या देशाचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे. राजकारण, व्यवसाय, प्रशासन, सर्वत्र भ्रष्टाचाराचे सावट पसरलेले आहे. यामुळे जनतेला मोठे आर्थिक नुकसान होत आहे आणि विकासाच्या प्रक्रियेला मोठा खिळ बसली आहे. जातीय आणि धार्मिक विषमता ही आपल्या समाजातील एक अत्यंत दुर्दैवी वास्तवता आहे. अनेक शतकांपासून चालत आलेल्या या विषमतेमुळे समाजात फूट पडली आहे आणि विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. आर्थिक विषमता ही देखील एक गंभीर समस्या आहे. जाती धर्मातील तेढ व आर्थिक-सामाजिक विषमता या समस्यांमुळे समाजात दरी निर्माण झाली आहे आणि शांतीचे वातावरण बिघडले आहे. दुर्दैवाने महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार यांसारख्या समस्या आजही अस्तित्वात आहेत. दर्जेदार शिक्षण, परवडणारी आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही दिसून येतो. देशातील बहुसंख्य लोक अजूनही गरीबी आणि बेरोजगारीच्या चक्रात अडकलेले आहेत.
देशाने विज्ञान, तंत्रज्ञान आणि पायभूत सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रात प्रगती निश्चितच केली आहे. परंतु खऱ्या अर्थाने मुक्त आणि समृद्ध भारताची लढाई अजून संपलेली नाही. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी अजून खूप काम बाकी आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या बलिदानाला विसरून जाणे म्हणजे त्यांच्या बलिदानाची प्रतारणा करणे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी, न्याय, समानता आणि अखंडता या तत्त्वांचे पालक करण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाला आपापल्या जागी योगदान द्यावे लागेल. प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी समजून या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून काढण्यासाठी, जातीयतेला दूर ठेवण्यासाठी, धार्मिक सहिष्णुता वाढवण्यासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. स्वतंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचा संकल्प आपण सर्वांनी घ्यावा हीच विनंती.
भारत माता की जय !!!
सारंग अविनाश कामतेकर
९३७१०२४२४७