पिंपरी दि. २ (पीसीबी) – दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांनी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरामध्ये पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये नागरिकांचा सहभाग अर्थात फिडबॅक ऑनलाइन पद्धतीने दिला जात होता. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा प्रथम क्रमांक आला आहे. ‘सर्वोत्तम नागरिक अभिप्राय’ यामध्ये शहराला देशात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
दिल्ली येथे शनिवारी (दि. १) ‘स्वच्छ अमृत पुरस्कार’ सोहळा पार पडला. केंद्रीय नगरविकास मंत्री कौशल किशोर, केंद्रीय नगरविकास सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपायुक्त अजय चारठणकर, रविकिरण घोडके, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सल्लागार प्रतिनिधी विनायक पद्मने, आरोग्य कर्मचारी व गोकुळ भालेराव आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. त्यासाठी एप्रिलअखेरपर्यंत वेगवेगळी तीन पथके शहरात होती. नागरिकांचा सहभाग अर्थात फिडबॅक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. त्यासाठी दिलेली लिंक ओपन करून त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. त्यामध्ये सर्वाधिक नागरिकांनी फिडबॅक नोंदवला आहे. तसेच योग्य उत्तरे दिल्याने शहराला देशामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. दरम्यान यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकालामध्ये पिंपरी चिंचवड शहराने देशामध्ये १९ वा तर राज्यामध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे.