स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

0
204

पिंपरी, दि. १९ – पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला बचत गट व महिला संस्थांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. झोपडपट्ट्यात शून्य कचरा उपक्रम, सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छतेसह, सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे कामही महिला बचत गटांना देण्यात आले आहे. शहरातील आणखी ४९ सामुदायिक शाैचालये महिला बचत गटांना चालविण्यास देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खाेराटे यांनी दिली.

महापालिकेत गुरूवारी १८ एप्रिल रोजी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खाेराटे यांनी आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, आराेग्य विभागातील अधिकारी, कर्मचा-यांची बैठक घेतली. या बैठकीला आराेग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहायक आयुक्त तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अंकुश जाधव, राजेश आगळे, सिताराम बहुरे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे यांच्यासह सहायक आराेग्याधिकारी, सीटीओ संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

पिंपरी-चिंचवड शहरात १०१ सामुदायिक शाैचालये आहेत. नवी दिशा उपक्रमाअंतर्गत शहरातील ५२ ठिकाणच्या सामुदायिक शौचालयांच्या साफसफाईचे काम महिला बचत गटांना देण्यात आले आहे. त्यांना किरकोळ दुरुस्तीसाठी सहा महिन्यांसाठी ५ हजार रूपये पालिका देत आहे. बचत गटांचे काम चांगले असल्याने सार्वजनिक शौचालयांसह, स्वच्छतागृहांच्या दैनंदिन साफसफाईचे काम ठेकेदारांना न देता त्यांना देण्यात येत आहे. आता उर्वरित ४९ शाैचालयेही महिला बचत गटांनाच देखभाल, दुरूस्तीसाठी देण्यात येणार आहे. यासाठी तयारी करण्याच्या सुचना अतिरिक्त आयुक्त खाेराटे यांनी क्षेत्रिय अधिका-यांना दिल्या आहेत.

झोपडपट्टीतील शून्य कचरा उपक्रमाला गती द्या
महापालिकेच्या वतीने नवी दिशा अंतर्गत शहरातील झोपडपट्टीत शून्य कचरा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भोसरी येथील गवळीमाथा झोपडपट्टीमधील दैनंदिन निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाला आहे. याच धर्तीवर शहरातील सात प्रभागातील झोपडपट्यामध्ये शुन्य कचरा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पालिकेने पाऊले उचलली आहेत. या उपक्रमासाठी शेड उभारण्यात आले आहेत. विद्युत जाेडणी आणि इतर कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त खाेराटे यांनी दिल्या आहेत. शून्य कचरा उपक्रमाची माहिती देण्यासाठी सहायक आराेग्याधिकारी, समूह संघटक, निवडलेल्या बचत गटाच्या महिलांना १३ मे नंतर प्रशिक्षणाचे आयाेजन करण्यात येणार आहे.

नवी दिशा अंतर्गत आराेग्य विभागाच्या वतीने शहरातील सामुदायिक शाैचालये महिला बचत गटांना चालविण्यास देण्यात येत आहेत. महापालिकेच्या आठही प्रभागात १०१ सामुदायिक शाैचालये आहेत. यापैकी आत्तापर्यंत ५२ शाैचालये महिला बचत गटांना चालविण्यास दिली आहेत. त्यामुळे महिलांना राेजगार उपलब्ध झाला आहे. उर्वरित ४९ शाैचालये चालविण्यास देण्यासाठी लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मंजुरी देण्यात येणार आहे.

  • विजयकुमार खाेराटे, अतिरिक्त आयुक्त-2, पिंपरी-चिंचवड महापालिका.

शौचालयांची साफसफाई, देखभाल व दुरूस्ती, तसेच, झोपडपट्ट्यांत शून्य कचरा उपक्रमात महिला बचत गटांचा सहभाग वाढविला आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी शून्य कचरा उपक्रम सातही प्रभागात राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता सात प्रभागातील झोपडपट्यांमध्ये शून्य कचरा उपक्रम राबविण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. या उपक्रमाची सर्व तयारी करून आचारसंहिता संपल्यानंतर याची सुरूवात केली जाणार आहे.

  • यशवंत डांगे, सहायक आयुक्त, आरोग्य विभाग