स्वच्छतागृहासाठी छावा चे लोटा आंदोलन .. भक्ती शक्ती उद्यानात स्वच्छतागृहाची मागणी.

0
398

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून पहीले जाते. त्याच पद्धतीने देशातील शंभर स्मार्ट सिटी मध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या शहराचा औद्योगिक नगरी म्हणून सुद्धा मोठा नावलौकिक आहे. त्यामुळे या शहराकडे औद्योगीकरणामुळे कामगार वर्गाचा ओढा जास्त असतो.

या शहराचा विकास तेवढ्याच झपाट्याने होत असताना या शहराने येथील नागरिकांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच मनोरंजनासाठी व विरंगुळ्यासाठी विविध प्रकारची उद्याने सुद्धा महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेली आहेत. त्यात प्रमुख म्हणून भक्ती शक्ती उद्यान निगडी या उद्यानाकडे पाहिले जाते. या उद्यानामध्ये छत्रपती शिवराय आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांचे पूर्णकृती समूहशिल्प आहे.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या गुरु शिष्याचा म्हणजे भक्ती शक्तीचा मिलाप दाखवणारे शहरातील अत्यंत महत्त्वाचे शिल्प आहे. याच ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा आपल्या हिंदुस्तानचा तिरंगा ध्वज सुद्धा अत्यंत डौलाने फडकत असतो. असा सर्व सुंदर देखावा पाहण्यासाठी आणि उद्यानामध्ये मनोरंजनासाठी प्रत्येक दिवशी हजाराहून अधिक नागरिक सहकुटुंब,अबाल वृद्ध,महिलांसह येथे येत असतात.

हे उद्यान म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार आहे. आणि याच उद्यानामध्ये हजारो ने येणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेचे एकही स्वच्छतागृह किंवा प्रसाधन ग्रह नसणे ही शहरासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या ठिकाणी लहान मुले तसेच महिला वर्गाला प्रसाधनग्रह उपलब्ध नाहीत हे अत्यंत लाजिरवाणे आणि अपमान कारक आणि स्मार्ट सिटीला काळीमा फासणारे आणि अशोभनीय आहे. अशा मोठ्या आणि पवित्र उद्यानात जनतेच्या सोयीसाठी स्वच्छता ग्रह नसणे आणि आपण स्मार्ट सिटीच्या कोटींच्या गप्पा मारणे हे निरर्थक आहे.

तसेच भक्ती शक्ती येथे 2 फेब्रुवारी रोजी संत तुकाराम महाराज जयंती व 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो. येथे या भक्ती शक्तीच्या समूह शिल्पास अभिवादन करण्यासाठी हजारो शिवप्रेमी नागरिक येत असतात.

येथे प्रसाधन ग्रह नसल्याने बरेच लहान थोर मंडळी उद्यानातच उघड्यावर शिल्पाच्या पाठीमागे लघुशंकेश गेलेले वारंवार आढळून आले आहे. त्याबाबत सूचना सुद्धा वेळोवेळी करण्यात आल्या आहेत. तसेच आम्ही वेळोवेळी छावा मराठा युवा महासंघाच्या व शिवजयंती उत्सव समितीच्या बैठकीमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत या विषयावर बऱ्याचदा चर्चा केली. विषय पटलावर व गांभीर्याने घेऊन उद्यानामध्ये प्रसाधन गृह बांधण्याची मागणी सुद्धा केली. परंतु महापालिका प्रशासनाने आश्वासनेच दिली, पण आज तागायत एकही प्रसाधनगृह उभारण्यात आले नाही. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठीतसेच प्रशासनाच्या या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे याचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याचा निषेध करत स्वच्छतागृह उभारणीच्या मागणीसाठी आम्ही छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक २७ एप्रिल 2023 रोजी महापालिकेसमोर लोटा आंदोलन हे प्रतीकात्मक आणि निषेध आंदोलन करन्यात आले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय जाधव,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दादासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश सरकटे, सुरज ठाकर, जिल्हा संघटक गोविंद पवार, सचिन आवटी, शहराध्यक्ष संतोषजी वाघे,शहर उपाध्यक्ष गणेश भांडवलकर, रिक्षा आणि वाहतूक संघटनेचे मोईनुद्दीन शेख, अफरोज बागवान, अंकुश भवर, सतीश कोरडे,रियाज मनियार,चांद सय्यद,अहमद शेख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.