स्मार्ट सिटी मिशनचा कालावधी 30 जून 2024 पर्यंत वाढविला

0
222

पिंपरी, २७ (पीसीबी): पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची २३ वी बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे सोमवार (दि.२६) रोजी महाराष्ट्र राज्य वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, स्वतंत्र्य संचालक यशवंत भावे, प्रदीप भार्गव, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे (ऑनलाईन), शहर अभियंता मकरंद निकम, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, व्यवस्थापक (इन्फ्रा.) मनोज सेठिया, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत १५ विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये, स्मार्ट सिटी मिशनचा कालावधी 30 जून 2024 पर्यंत वाढविण्यात आला असून याबाबत नोंद घेण्यात आली. पादचारी मार्ग, सायकल मार्ग, युटिलिटी कंड्युट्स/ पाण्याचे नाले, रोड मार्किंग, स्ट्रीट लाईट, स्ट्रीट फर्निचर, ट्रॅफिक यांचा समावेश असलेल्या एबीडी परिसरात स्मार्ट रस्ते बांधकामासाठी प्रकल्पाच्या कालमर्यादा विस्तारावर चर्चा करण्यात आली. तसेच, पिंपरी चिंचवड येथे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत साइनेज, स्ट्रीट लँडस्केपिंग वर्क्स जंक्शन सुधारणा, स्मार्ट टॉयलेट्स आणि इतर विविध कामे, दोन उद्यानांचा पुनर्विकास या कामासाठी 6 महिन्यांच्या मुदतवाढीला मान्यता देण्यात आली. तसेच, महानगरपालिका ई-क्लासरूम प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी मे. केपीएमजी द्वारे व्यवस्थापित मनुष्यबळासह प्रोजेक्ट मॅनेजमेंट युटीलिटी (PMU)च्या विस्तारावर चर्चा करून सदर विषयास मंजूरी देण्यात आली. जीआयएस प्रणाली सक्षमीकरणासाठी मे. एटॉस इंडिया प्रा. लि. यांना 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावास बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासह ओएफसी सिटी नेटवर्क अंतर्गत गॅन्ट्री आणि वायफाय पोलची उभारणी करण्याच्या प्रकल्पाच्या कालमर्यादा विस्तारावर चर्चा करून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली.

प्रसंगी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची माहिती देणारे क्युआर कोड व माहिती पुस्तीकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी प्रास्ताविक व आभार मानले.