पिंपरी, दि. २५ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड शहरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नव्याने एक हजार १५० वाहनांची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ५४९ चारचाकी मोटारींची, तर ५०१ दुचाकींची नोंद झाली आहे. दुचाकीपेक्षा चारचाकीला नागरिकांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळी, गुढी पाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांकडून मोठी पसंती दिली जाते. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत अनेक जण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. यंदा १५ ते २२ एप्रिल या आठ दिवसांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एक हजार १५० वाहनांची नोंद करण्यात आली. यामध्ये चारचाकी मोटार, दुचाकीसह मालवाहतूक वाहने आणि इतर वाहनांचा समावेश असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.











































