पिंपरी दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराचा तिसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. मात्र, त्यानंतरही स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले सर्व प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत स्मार्ट सिटीच्या सर्व प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, मात्र, जूनपूर्वीच स्मार्ट सिटीतील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर असणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ शेखर सिंह यांनी सांगितले.
आयुक्त सिंह म्हणाले, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्मार्ट सिटी योजना 25 जून 2015 रोजी घोषित करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी चॅलेंजच्या तिस-या फेरीमध्ये भारत सरकारकडून पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटीची निवड झाली. 13 जुलै 2017 रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांचे कामकाजाकरीता केंद्र शासन, राज्य शासन आणि पिंपरी- चिंचवड महापालिका यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यात येत आहे.
केंद्र शासनाचे मार्गदर्शन सूचनांनुसार स्मार्ट सिटी अंतर्गत ऑप्टिकल फायबर नेटवर्क हा प्रकल्प देखील राबविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी ऑप्टीकल फायबर नेटवर्क सिस्टीम हे स्मार्ट सिटीच्या पायाभूत सुविधांमधील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. स्मार्ट सिटी घटकांना परस्परांशी जोडण्यासाठी आणि अद्ययावत व योग्य कृतीसाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचा पुरवठा करण्यामध्ये स्मार्ट सिटी फायबर ऑप्टीकल नेटवर्क सिस्टीमची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली स्मार्ट उपकरणे (उदा. सीसीटीव्ही कॅमेरे, सिटी वायफाय, स्मार्ट किओक्स आणि डिस्प्ले बोर्ड (VMD), स्मार्ट ट्रॅफीक, स्मार्ट पार्कीग ) सिटी नेटवर्कच्या माध्यमातून Integrated command & control centre (ICCC) ला जोडण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत शहरामध्ये एकूण 600 किमी अंतराचे Optical fiber Network व सतराशे पोलचे जाळे टाकण्यात आले आहे. भविष्यात या प्रकल्पाद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीस उत्पन्न मिळणार आहे. तसेच वारंवार होणा-या गैरसोयीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. ही पायाभूत सुविधा खूप मोठी असून डक्ट आणि केबल्सद्वारे महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीसाठी महसूल मिळवण्यासाठी त्याचा फायदा होणार असल्याचेही सिंह यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत “रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल” हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. देशातील कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प राबविण्यात आलेला नसून या स्वरुपाचा पथदर्शी प्रकल्प देशामध्ये प्रथमच पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत राबविण्यात आला आहे. ही निविदा प्रक्रिया ही स्पर्धात्मक पध्दतीने आणि अत्यंत पारदर्शीपणे पार पाडण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षापासून स्मार्ट सिटी कंपनीला केंद्र व राज्य शासनाकडून कुठलाही निधी प्राप्त होणार नसून सदर प्रकल्पामुळे स्मार्ट सिटी कंपनी स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. तसेच, महापालिकेवरील आर्थिक भार कमी होणार आहे, असेही ते म्हणाले.