स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक

0
204

पिंपरी, दि.१८(पीसीबी) “स्मार्ट इंडिया हॉकेथॉन एसआयएच) २०२२” या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (पीसीसीओई) टीम “वॉटर गार्डियन्स”ने “स्मार्ट ऑटोमेशन श्रेणी अंतर्गत” “स्मार्ट शहरांमध्ये पाण्याच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी आणि मर्यादित करण्यासाठी स्मार्ट सिटी वॉटर मॅनेजमेंट सिस्टम” हा लक्षवेधक प्रकल्प सादर करून अंतिम फेरीतील प्रथम क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी येथे आयोजित केलेल्या “स्मार्ट इंडिया हॉकेथॉन २०२२” च्या ग्रँड फिनालेत हार्डवेअर एडिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. प्रतीक शेट्टी हा “वॉटर गार्डियन्स” टीमचा कॅप्टन होता या टीममध्ये सोहेल शेडबाळे, राशी राठी, रुद्रेश श्रीराव, राधिका डोईजड यांचा समावेश होता. त्यांना प्रा. प्रकाश सोनटक्के आणि प्रा. वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) या स्पर्धेचे आयोजन केले होते. ही एक देशव्यापी उत्पादन विकास स्पर्धा आहे. यामध्ये स्पर्धकांना दररोज अनुभवात येणाऱ्या काही सर्वात मोठ्या आव्हानांवर सर्जनशील उपाय शोधण्यास सांगितले होते.

विजेत्या स्पर्धकांचे आणि मार्गदर्शकांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी अभिनंदन केले आहे.