स्फोट प्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा दाखल

0
284

पुणे, दि.९ (पीसीबी) – आळंदी जवळ असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून 19 जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.

नरेंद्र मोहनलाल सुराणा (रा. गुलटेकडी, पुणे), फनेंद्र हरकचंद मुनोत (रा. शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोळू ते खटकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलॉय प्रा ली ही कंपनी आहे. ही कंपनी मागील चार वर्षांपासून बंद आहे. कंपनी बंद असताना देखील कंपनीमध्ये एल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनविण्यासाठी आणलेला स्फोटक कच्चा माल कंपनीत साठवून ठेवण्यात आला होता. त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. गुरुवारी सायंकाळी या कच्चा मालाला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. यात सुरुवातीला दोघांचा मृत्यू झाला. तसेच अनेकजण जखमी झाले. घटनेत घरांचे, वाहनांचे आणि दुकानांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.