स्पर्धात्मक, गुणात्मक, नाविण्यपूर्ण विचार वाढीकरीता ‘जल्लोष… शिक्षणाचा’ उपक्रम

0
219

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नाविण्यपूर्ण विचार वाढीकरीता विद्यार्थी व शालेय स्तरावर “जल्लोष…..शिक्षणाचा 2022” या स्पर्धेचे 1 डिसेंबर 2022 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत आणि आनंदोत्सव (कार्निवल)चे 24, 25 आणि 26 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात येणार आहे.

जल्लोष…..शिक्षणाचा 2022 या स्पर्धात्मक उपक्रमात शाळा स्पर्धा अंतर्गत मूल्यमापन समिती गठीत केली जाऊन ही समिती मापदंड पडताळणी करेल. शाळा स्तरावरचे मूल्यांकन 15 ते 30 डिसेंबर या कालावधीत होईल. प्रत्येक झोनमधून महापालिकेची प्रत्येकी एक शाळा याप्रमाणे एकूण 8 शाळा मॉडेल शाळा ठरविल्या जातील. मिळणा-या बक्षिस रकमेतून 25 टक्के रक्कम शाळेच्या विकासावर खर्च करणेस शाळेला अधिकार दिले जातील आणि उर्वरित 75 टक्के रक्कम शाळेस मॉडेल स्कूल बनविणेकरीता खर्च केली जाईल.

महापालिका व खासगी शाळांकरीता आयोजित विद्यार्थी स्पर्धा या उपक्रमांतर्गत, प्रत्येक शाळेतून 5 वी ते 9 वी मधून 5 विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे किमान 5 ते 10 गट या स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक गटाने स्मार्ट सिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पर्यावरण, आरोग्य इ. विषयांवर सादरीकरण व मॉडेल तयार करावे. मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्येक शाळेतून 1 किंवा 2 उत्कृष्ट गटाची निवड करुन, या गटाची आंतरशालेय स्पर्धेकरीता नोंदणी करतील. विद्यार्थी स्तरावरचे मूल्यांकन 15 ते 30 डिसेंबर या कालावधीत होईल. आंतरशालेय स्पर्धेत महापालिका शाळेतील विद्यार्थी व खाजगी शाळेतील विद्यार्थी यांना वेगवेगळी पारितोषिके दिली जातील.

तीन दिवसीय कार्निवल (आनंदोत्सव) मध्ये विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार केला जाईल. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रकल्प प्रदर्शित करणारे स्टॉल्स्, कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ स्टॉल्स्, गेमझोन, AERO Modelling Show इ. ची रेलचेल असेल.