स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे

0
134

आमदारांच्या दबावामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनी भाजप कोअर कमिटीची शिफारस धुडकावली

पिंपरी, दि. २५ – पिंपरी चिंचवड महापालिकेत १२८ पैकी तब्बल ८४ नगरसेवकांचे बहुमत असूनही सत्ताधारी भाजप अंतर्गत गटबाजी आता थेट पक्षाच्या मुळावर आली आहे. महापौर पदाचे नाव निश्चित करताना त्याची झलक पहायला मिळाली मात्र, आता स्थायी समिती अध्यक्षपदाचे नाव निश्चित करतानाही थेट नेत्यांची अक्षरशः कसोटी पणाला लागली. या पदासाठी संदीप कस्पटे आणि अभिषेक बारणे ही दोनच नावे अंतिम स्पर्धेत होती. पक्षाच्या कोअर कमिटीतील सात सदस्यांनी संदीप कस्पटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते पण, ती शिफारस डावलून आमदारांच्या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर अभिषेक बारणे यांचे नाव निश्चित करण्यात आले. शनिवारी या पदासाठी निवडणूक होणार असून समितीत भाजपचेच बहुमत असल्याने बारणे यांची निवड जवळपास निश्चित समजली जाते.
भाजपमध्ये आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, अमित गोरखे यांचे स्वतंत्र तीन गट आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा चौथा गट कार्यरत आहे. निवडणुकित बहुमत मिळाल्याने महापौर पदासाठी पक्षाचे शहराध्यक्ष काटे हे प्रबळ दावेदार होते आणि ८४ सदस्यांचे श्रेय म्हणून त्यांना संधी मिळणार अशी शक्यता होती. प्रत्यक्षात निष्ठावंत गटातून शितल शिंदे यांचे नावही चर्चेत कायम होते. काटे यांना संधी मिळू नये म्हणून आमदार जगताप यांनी महेश लांडगे यांच्यासह सर्व प्रतिष्ठा पणाला लावली. कोअर कमिटीची शिफरस तसेच तडजोडीचे नाव म्हणून रवी लांडगे यांचे नाव अचानक पुढे आले. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीसुध्दा स्वर्गीय अंकुश लांडगे यांच्या घराण्याचे पक्षावर अनंत उपकार म्हणून रवी लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तिथे आमदार जगताप यांनी आमदार लांडगे यांना मदतीला घेऊन काट्याने काटा काढला आणि शत्रुघ्न काटे यांचा पत्ता कट केल्यापासून खदखद वाढत गेली.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी स्वतः काटे यांच्यासह संदीप कस्पटे, अभिषेक बारणे यांची नावे स्पर्धेत होती. काटे की कस्पटे या चर्चेत कस्पटे यांच्या बाजुने कौल मिळाला. कोअर कमिटीतील सात सदस्यांनीही कस्पटे यांचे नाव अंतिम केले आणि प्रदेश कार्यकारणीकडे शिफारस पाठवली. आमदार जगताप यांनी अभिषेक बारणे यांचे नावाची शिफारस केली होती, ती डावलल्ये ते नाराज झाले. पुन्हा हे प्रकरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दारात गेले. आमदार म्हणून आम्ही केलेल्या नावाला महत्व नसेल तर खाली कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जाईल, असा निरोप आमदारांनी फडणवीस यांच्याकडे पोहचविला. शेवटी खुद्द देवाभाऊंनीच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना आमदार सांगतील त्याप्रमाणे निवड करण्याचे आदेश दिले. नंतर वेगाने घडामोडी झाल्या आणि अभिषेक बारणे यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. असे सांगण्यात आले.