स्थानिक स्वराज्य संस्थेत कायदे माहिती असणार्‍यांची कमतरता : कामतेकर

0
444

संगमनेर पत्रकार मंचने आयोजित केलेल्या व्याख्यानाला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद..

संगमनेर, दि.२० जून (पीसीबी) : आजकाल अनेकजण केवळ समाजात मानसन्मान मिळावा यासाठी, तर काहीजण परिसरातील नागरीकांच्या पत्रिकेत आपलं नाव यावं यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतात. त्या माध्यमातून जर तुम्ही समाजाची सेवा करणार असाल, समाजाला दिशा देणार असाल तर तो तुमचा हक्क आहे. मात्र केवळ मानसन्मान आणि प्रतिष्ठा म्हणून कोणी निवडणुका लढवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात जाणार असेल तर त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा लोकप्रतिनिधींच्या समोर माणसं त्याचा सन्मान तर करतात, मात्र पाठ फिरताच त्याला शिव्याही घालतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी आपण कायदे मंडळाचे सभासद असल्याचे भान राखले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन स्थानिक स्वराज्य संस्था या विषयाचे गाढे अभ्यासक सारंग कामतेकर यांनी केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पत्रकार मंचच्यावतीने आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था : लोकप्रनिनिधींचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावरील त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, पत्रकार मंचचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने, प्रकल्प प्रमुख श्याम तिवारी, उपाध्यक्ष गोरक्ष नेहे व सचिव संजय अहिरे आदी उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना कामतेकर म्हणाले की, आपल्या परिसरातील दहावे, लग्न समारंभ, उद्घघाटन, मयती अथवा साखरपुड्यांना न चुकता हजेरी लावणार्‍यांना लोकप्रतिनिधी होण्याची मोठी लालसा असते. त्यासाठीचे त्यांचे निकष म्हणजे तो माझ्या घरी कार्यक्रमाला आला होता, चांगला माणूस आहे असाच असतो. लोकप्रतिनिधींनी अशा कार्यक्रमांना हजेरी लावून लोकांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण कराव्या. मात्र त्याचवेळी त्यांनी हे देखील लक्षात घेण्याची गरज असते की, लोकप्रतिनिधींचे तेवढेच कर्तव्य नसते. तर निवडणूक लढवून सभागृहात पोहोचलेला लोकप्रतिनिधी हा कायदे मंडळाचा सदस्य होतो. त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रासाठी धोरणं ठरवणार्‍या समुहाचा तो घटक असतो. त्या माध्यमातून सभागृहाने तयार केलेल्या नियमांची व कायद्यांची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांवर त्याचा धाक असण्याची गरज असते, पण दुर्दैवाने तसं होतांना मात्र दिसत नाही. हल्ली स्थानिक स्वराज्य संस्थांतील बहुतेक सदस्य अधिकार्‍यांकडे आमदार व खासदारांकडे जातात आणि साहेब हे काम कसंही करुन मार्गी लावा असा आग्रह धरतात. कसंही करुन याचा नेमका अर्थ काय? असा सवाल उपस्थित करुन कामतेकर म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण एखादे काम घेवून या मंडळींकडे जातो, तेव्हा ते काम कायद्यात, नियमात बसते का? याचा अभ्यास असणे खूप आवश्यक असते.

तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी मत देवून तुम्हाला निवडून दिले आहे म्हणून कसंही करुन बसवा असे म्हटल्याने तुम्ही नेलेलं काम होईल का? याचा विचार करण्याची गरज असते. अन्यथा आपल्या अशा बोलण्यातून आपल्या अज्ञानाचेच दर्शन घडते. कारण कोणतेही काम कायद्यात आणि नियमांत नसेल तर कोणताही अधिकारी, आमदार वा खासदार काहीही करु शकत नाही. त्यामुळे आपण ज्या संस्थेच्या सभागृहात जात आहोत ती कायद्याने, नियमाने चालणारी संस्था आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे कायदा, नियम याबाबत माहिती असणार्‍यांची मोठी कमतरता असल्याचे सांगतांना लोकप्रतिनिधी अशिक्षित असणे, त्याला सभागृहाचे कायदे माहिती नसणे या कारणाने आपली लोकशाही काही प्रमाणात अडचणीत आल्याचेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील एक एक मुद्दा कोठे आणि कसा लागू होतो हे संविधान वाचल्याशिवाय समजाणार नाही. खरेतर त्यांनी अभिप्रेत असलेली लोकशाही आज आहे का? असाही प्रश्न या स्थितीत निर्माण होतो. आज सभागृहात असणार्‍या बहुतेकांना या कायद्यांचे ज्ञानच नसल्याने या गोष्टी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला ज्या संस्थेत काम करायचे आहे, त्या संस्थेचे नियम व कायदे समजावून घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे. विकास झाला पाहिजे हे खरं असलं तरीही तो होण्यासाठी आवश्यक असलेला निधी मुबलक प्रमाणात कसा मिळवता येईल याची जबाबदारीही लोकप्रतिनिधींची असते. त्यासाठी नियमांची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधींची साथ मिळायला हवी. कारण यातून घडणार्‍या बदलांचा चांगला परिणाम केवळ तुमच्या प्रभागावरच नाही तर त्या संपूर्ण संस्थेच्या कार्यक्षेत्रावर होतो हा विचार करणं आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र व राज्याकडून मिळणार्‍या निधीबाबत बोलताना कामतेकर म्हणाले की, या दोन्ही पातळ्यांवरुन विविध प्रकारच्या कामांसाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध असतो व तो केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनच खर्च करावा लागतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या निधीची माहिती मिळवून अधिकार्‍यांकडून तो मिळविण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागाचा आणि त्या माध्यमातून संपूर्ण परिसराचा विकास करु शकतो. आजच्या स्थितीत केंद्र आणि राज्य सरकारकडून 10 हजारांहून अधिक योजनांसाठी निधी उपलब्ध आहे. मात्र आजचे लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांवरच अवलंबून राहतात, अधिकार्‍यांनीच योजना तयार करायच्या आणि त्यांनीच निधी मिळवायचा अशी अपेक्षा हल्लीच्या लोकप्रतिनिधींना असते. खरेतर हे काम अधिकार्‍यांचे नसते तर ते लोकप्रतिनिधींनीच करणे अपेक्षित असते परंतु, माहितीच्या अभावाने तसे घडतांना मात्र आज दिसत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हल्ली बहुतेक लोकप्रतिनिधींची नावे एकतर उमेदवारी दाखल करताना किंवा त्यांचा कार्यकाळ संपल्यावरच लोकांना कळतात. म्हणजेच मधळ्या काळात त्यांची कारकीर्द काहीच नसते. काहींची नावे तर काहीतरी भानगडी केल्या म्हणूनच लोकांना कळतात. लोकप्रतिनिधी होणं म्हणजे केवळ समाजसेवा हा ज्यांचा उद्देश आहे, त्यांनी निवडणूका लढविण्याऐवजी एखादी सामाजिक संस्था काढावी. मात्र समाजसेवेला अधिकाराची जोड हवी असेल, समाजाचे आपण उत्तरदायी आहोत याची जाणीव असेल तर निश्चितच निवडणूक लढविली पाहिजे असेही कामतेकर आपल्या व्याख्यानात बोलताना शेवटी म्हणाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शशीकांत मंगरुळे म्हणाले की, लोकशाहीत जनता केंद्रस्थानी असते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर आजच्या व्याख्यानातून लोकाभिमुख, लोकोपयोगी समस्यांवर विचारमंथन घडले, त्या माध्यमातून आपली लोकशाही अधिक प्रबळ होण्यास मदतच होणार आहे. आपला देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहे, त्याचा अृमतमहोत्सवी उत्सवही यंदा आपण साजरा करीत आहोत. आपला देश जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेतून आपण पाच तत्त्व अंगिकारले आहेत. त्या माध्यमातून नैतीक आणि बौद्धिक पातळीवर लोकांच्या प्रश्नांची सुलभतेने उकल करुन मुलभूत सुविधांची पूर्तता होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

पत्रकार मंचचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी आपल्या प्रास्ताविकात मंचच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. समाजाला केंद्रस्थानी ठेवून अनेक अडचणींचा सामना करीत ग्रामीण भागातील पत्रकार काम करीत असल्याचे सांगताना त्यांनी महानगरातील पत्रकारांच्या तुलनेत ग्रामीण पत्रकारितेची स्थिती मांडली. प्रशासनासोबत सुसंवाद ठेवताना समाजासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यात ग्रामीण पत्रकारांचा मोठा हातभार लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. मंगेश सालपे यांनी स्वागत केले, नितीन ओझा यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला, संदीप वाकचौरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर संजय अहिरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संगमनेर तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.