स्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फलक लावल्याने शहराच्या सौंदर्यात बाधा

0
1

दि. १३ (पीसीबी)-रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फलक लावल्याने शहराचे सौंदर्यात बाधा येते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक लावण्यास बंदी घातली आहे. मात्र, आकुर्डीतील शुभ डेव्हलपर्सच्या वेदा गृहप्रकल्पाची विक्री करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणावर आश्लिल जाहिरात करण्यात आली होती. याबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून संबंधित बिल्डरवर ५० हजाराची दंडात्मक कारवाई करत आश्लिल जाहिरात काढण्याचे निर्देश दिले आहेत.

आकुर्डी परिसरातील जूना पुणे-मुंबई महामार्गावर एका बांधकाम व्यावसायिकाने गृहप्रकल्पाचे काम सुरु केले आहे. त्या डेव्हलपर्सने आपल्या शुभ वेदा गृहप्रकल्पाची जाहिरात करण्यासाठी मोठ्या आकाराचा महिलांचा अशोभनीय असलेला जाहिरात फलक उभारला आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर अश्लील किंवा समाज मान्यतेच्या विरुद्ध जाहिराती झळकविल्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यानुसार आकुर्डी परिसरात शुभ वेदा प्रकल्पाने लावलेली जाहिरात आक्षेपार्ह स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित जाहिरात फलक काढून टाकण्यात आला. तसेच नियमभंग केल्याबद्दल ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील बेकायदेशीर व अश्लील जाहिरातींवर मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर प्रशासनाने या प्रकरणात तत्परतेने कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने जाहिरातदारांना इशारा दिला आहे की, शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचवणाऱ्या, अशोभनीय अथवा अश्लील जाहिराती केल्यास कडक दंडात्मक कारवाई केली जाईल.

शहरात जाहिरात बंदी

शहरात कुठेही महापालिका क्षेत्रीय कार्यालयाकडून जाहिरात फलक, फ्लेक्स लावण्यास परवानगी न घेता वाढदिवस, अभिनंदन, शुभेच्छा, श्रध्दाजंली आणि इतर जाहिरात फ्लेक्स, बॅनर लावून शहर विद्रुपीकरण केले जात होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, किऑक्स आढळून आल्यास त्यावर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकांकडून कारवाई केली जात आहे. तसेच जाहिरात फलक लावण्यास शहरात सर्वत्र बंदी घालण्यात आली असून परवानगी धोरण देखील बंद करण्यात आले आहे.

या नियमानुसार कारवाई सुरु

महाराष्ट्र राज्यातील मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९९५ चे कलम ३ तसेच महाराष्ट्र अधिनियमातील कलम २४४ (१) (२) (३), २४५(१) (२) आणि महानगरपालिका आकाशचिन्ह तसेच जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण करणारे नियम दिनांक ९ मे २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार तरतुदी निर्गमित करण्यात आल्या असून या नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदी उभारण्यात आले असल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येत आहे.