स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर गोळीबार

0
3

प्रकृती गंभीर

दि.21 (पीसीबी)चाकण जवळील महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (२० जानेवारी) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास घडली. अजय विक्रम सिंग (३४, चाकण. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय सिंग हे मागील काही वर्षांपासून चाकण येथे वास्तव्यास आहेत. ते महाळुंगे येथील एका स्टील कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास ते कंपनीच्या आवारात असताना दोन हल्लेखोर हेल्मेट घालून कंपनीच्या आवारात आले. त्यांनी अजय सिंग यांच्यावर गोळीबार केला आणि वराळेच्या दिशेने पळून गेले.

या हल्ल्यामध्ये अजय सिंग यांच्या पोटात आणि कमरेत दोन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.