स्कूल बस आणि कारची समोरासमोर धडक; दोन विद्यार्थी जखमी

0
69

पिंपरी, दि. 30 जुलै (पीसीबी) – बीआरटी मार्गातून जाणाऱ्या स्कूल बस आणि बीएमडब्ल्यू कारची समोरासमोर धडक बसली. या अपघातात कार चालक आणि बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 29) दुपारी बारा वाजताच्या सुमारास ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे घडली.यश मित्तल (वय 29, रा. आकुर्डी) असे जखमी कार चालकाचे नाव आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यश मित्तल हा त्याच्या ताब्यातील बीएमडब्ल्यू कार (एमएच 14/केएल 5499) घेऊन ऑटो क्लस्टर येथील बीआरटी मार्गातून जात होता. त्याचवेळी एका खासगी शैक्षणिक संस्थेची स्कूलबस बीआरटी मार्गातून समोरून येत होती. कार आणि स्कूल बसची समोरासमोर जोरात धडक बसली. यामध्ये स्कूल बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. तसेच कारचेही मोठे नुकसान झाले.

स्कूलबसमध्ये 15 विद्यार्थी होते. त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसमधून बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बीआरटी मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, अपघातस्थळी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.