सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मानित

0
5

पिंपरी,दि.१७ – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेने मे २०२५ मध्ये घेतलेल्या सनदी लेखापाल (सी.ए.) या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून उत्तीर्ण झालेल्या सीमा चौधरी आणि अनिकेत वढणे या विद्यार्थ्यांना सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने बुधवार, दिनांक १६ जुलै २०२५ रोजी सन्मानित करण्यात आले.
माजी महापौर योगेश बहल, सामाजिक कार्यकर्ते किरण सुवर्णा, विश्वनाथ अवघडे, मोहन आडसूळ आणि सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांच्या उपस्थितीत हे सन्मान करण्यात आले. याप्रसंगी योगेश बहल यांनी, ‘विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय निश्चित करून त्याला नियमित अभ्यास, स्वयंशिस्त याची जोड दिल्यास अतिशय अवघड परीक्षांमध्ये यश प्राप्त करता येते. सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका या संस्थेचे या संदर्भातील योगदान अभिनंदनीय आहे!’ असे मत व्यक्त केले
. सन्मानार्थींच्या वतीने सीमा चौधरी यांनी आपल्या मनोगतातून, ‘सोहम् अभ्यासिकेत रोज आठ ते दहा तास खडतर असा अभ्यास तसेच वृत्तपत्रांचे वाचन आणि नेरकर सरांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले!’ असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार मानले. परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालक यांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.