दि. ३० ( पीसीबी ) ताथवडे येथील तब्बल ९०० फ्लॅटधारक सदस्य असलेल्या एलेमेंटा सोसायटीधारकांनी सुधारीत विकास आराखड्यातील डिपी रस्त्यावरून पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या बेधुंद कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढत मोर्चा काढला.
सोसायटीच्या जागेतून १८ मीटर रुंदिचा रस्ता डीपी मध्ये प्रस्तावित कऱण्यात आला आहे. सोसायटीचे क्लब हाऊस, फ्लॅटधारकांसाठीचे वाहनतळ आणि रस्त्याच्या जागेतून डिपीमधील १८ मीटरचा रस्ता टाकला आहे. या निययोजित रस्त्यामुळे सोसायटीची दोन्ही मुख्य प्रवेशद्वारे बाधित होतात. सोसायटीची सुरक्षा धोक्यात येणार आहे. शेजारच्या सुमारे २००० फ्लॅटधारकांच्या दुसऱ्या सोसायटीलाही याचा मोठा फटका बसणार आहे.
मोर्चात सहभागी नागरिकांनी महापालिका प्रशासनावर कठोर शब्दांत तोंडसूख घेतले. या डिपी रस्त्याच्या माध्यमातून काही लोकांना टीडीआर उकळायचा आहे, असा गंभीर आरोप कऱण्यात आला.
महापालिकेचे सर्व नियम पाळून सुरक्षित आणि निवांत घर म्हणून नागरिकांनी इथे आयुष्याची कमाई लावली आणि घरे खरेदी केली. आता नवीन रस्त्यामुळे सर्व धोक्यात आलेत. २०१६ च्या मंजूर विकास आराखड्युसार रितसर खरेदी खत, डिम्ड कन्वेन्स झालेले असताना आता हे नवीन संकट समोर आल्याने प्रशासनावर सदस्यांनी टीकेची झोड उठवली. सोसायटी धारकांनी याच विषयावर हरकत नोंदवली आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील चुकिच्या पध्दतीने रस्ता टाकल्याचा निषेध म्हणून सभासदांनी हातात फलक घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला. १८ मीटरचा तो रस्ता तत्काळ रद्द करा, आमच्या कायदेशीर हक्काचा सन्मान करा, अशी विनंती सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष प्रवीण फराड यांनी यावेळी केली.