सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश : एकनाथ पवार

0
421

– राष्ट्रवादी पुरस्कृत सोसायटी संवाद उपक्रमावर टीका
– राष्ट्रवादीतील बिल्डर आता समस्या काय सोडवणार ?

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल २० वर्षे सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आता सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी दस्तुरखुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पाचारण करावे लागत आहे. ज्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक बांधकाम व्यावसायिक आहेत आणि ज्यांनी शहर विस्तारत व विकसित होत असताना पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले, ते काय सोसायटीधारकांच्या समस्या सोडवणार? अशी टीका भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘संवाद सोसायटी धारकांशी’ असा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत शहरातील सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार स्वत: शहरात येणार आहे. संतोषनगर- थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात उद्या, दि. ५ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. यासंदर्भात एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

एकनाथ पवार म्हणाले की, राष्ट्रवादीची सत्ता असताना २० वर्षांत शहर विस्तारीत होत होते. त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात प्रकल्प उभारले. त्यावेळी झालेल्या नियमबाह्य कामांमुळे आज शहरातील सोसायटीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, या उपक्रमासाठी राष्ट्रवादीने भोसरी, पिंपरी आणि चिंचवड असे तीन विधानसभा मतदार संघनिहाय समन्वयक नेमले आहेत. वास्तविक, हा उपक्रम हा आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोसायटीधारक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. तीन मतदार संघासाठी नेमलेले सर्व समन्वय आणि संपर्क प्रमुख हे स्वत: पेशाने बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) आहेत. राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत बांधकाम व्यावसायिकांची ‘लॉबी’ कार्यरत असताना सर्वसामान्य सदनिकाधारकांना न्याय कसा मिळणार? हा प्रश्न आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अपशय…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पाचारण करावे लागते. दीड-दोन हजार पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी असा दावा करणारे शहरातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे हे अपयश आहे. सोसायटीधारकांचा पुळका निवडणुकीच्या तोडावर आला आहे. त्यामुळे मतदार राष्ट्रवादीच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा घणाघातही एकनाथ पवार यांनी केला आहे.