सोशल मीडिया वरील ग्रुपवर वर्चस्व राहावे म्हणून मित्राचा दगडाने ठेचून खून

0
297

चाकण, दि. २८(पीसीबी) सोशल मीडियाच्या ग्रुपवर आपलेच वर्चस्व राहावे तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्राने आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. एवढेच नाही तर खून करतानाचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (२६ फेब्रुवारी) रात्री चाकण येथे घडला.

मेदनकरवाडी येथे राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलाचा खून झाला आहे. या प्रकरणी त्याच्या 65 वर्षीय आजोबांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खून करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलावर 2023 मध्ये खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मयत मुलगा आणि दोन्ही अल्पवयीन मुले हे मित्र आहेत. मयत मुलगा गुन्हेगार असल्याने स्वतःला नेहमीच भाई समजत असे. त्यामुळे तो नेहमीच मित्रांना हाणामारी करायचा. सोमवारी दिवसभर मयत मुलगा आणि दोन्ही आरोपी मुले बियर प्यायले. दारूच्या नशेत त्यांची एकमेकांबरोबर भांडणे झाली. या रागातून आरोपींनी मयत मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केला.

आरोपी एवढे दारू पिले होते की आपण काय करत आहोत आणि काय गुन्हा केला आहे, याचे भान त्यांना नव्हते. खून केल्यानंतर त्यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना आपण खून केल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने ते मोबाईल टाकून पळून गेले.

आरोपी असलेल्या दोघांपैकी मुख्य आरोपी मुलावर हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर नशेतच त्यांनी व्हिडिओ तयार केला. व्हिडिओ तयार करताना पुन्हा मित्राच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. मात्र, नशा कमी होताच आरोपींनी हा व्हिडिओ डिलीट केला.

मयत मुलगा आणि दोन आरोपी यांनी शाळा सोडली होती. परिसरात भाईगिरी करत फिरणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. भाईगिरीमुळेच त्यांच्यात खुन्नस झाली होती. त्यातूनच हा गुन्हा घडला आहे.