सोशल मिडीयावर रामकथेचे तब्बल 1,300 दिवसांचे अनोखे सादरीकरण, गुुरुपौर्णिमेला होणार सांगता

0
510

पिंपरी,दि.११ (पीसीबी) – भागवत सप्ताह किंवा रामकथा महोत्सव असे आठवडा, पंधरा दिवसांचे कार्यक्रम ऐकतो किंवा करतो, परंतु चिंचवड येथील रवींद्र पाठक या अवलिया रामभक्ताने स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळत तब्बल तेराशे दिवसांची तुलसी रामायणावर आधारीत राम कथा सादर केली. विशेष म्हणजे या कथेची सांगता ही गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर होणार आहे. यानिमित्त श्रोत्यांनी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये 14 जुलैला सकाळी नऊ वाजता कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले आहे.

या तुलसी रामायणावर आधारीत 1300 दिवसीय रामकथेच्या पूर्णाहुतीनिमित्त श्रोत्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कृतज्ञता सोहळ्यात पंडित संजीव अभ्यंकर यांच्या अभंगाचा कार्यक्रम होणार आहे. याखेरीज अधिकारी संतांचे आशीर्वचन, तसेच कथा प्रवासाचा श्रोते व वक्त्यांकडून मागोवा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.

चिंचवड येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे अनुग्रहित शिष्य रवींद्र पाठक यांनी हे आगळ-वेगळं सादरीकरण केल आहे. गोस्वामी तुलसीदास यांच्या श्रीरामचरितमानस या ग्रंथावर दररोज 30 मिनिट या पद्धतीने गेले 1300 दिवस त्यांनी नित्य कथा चिंतन प्रसारित केलं जे देश विदेशामध्ये हजारो भाविकांनी ऐकले. यावेळी पाठक यांना चैतन्य गोशाळा ट्रस्टच्या विश्वस्त हर्षदा पाठक, नागनाथ इनामदार, हिंदूराव पवार, सचिन नाईक आदींनी विशेष सहकार्य केले.

पाठक यांनी या अगोदर 800 दिवस श्रीमत् दासबोध व 205 दिवस मनाचे श्लोक यावर देखील त्यांनी प्रदीर्घ चिंतन केले. कदाचित 1300 दिवसाची गायली गेलेली ही रामकथा ही इतिहासामधील सर्वात प्रदीर्घ कथा असू शकते, असा विश्वास पाठक यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पाठक यांची ही रामकथा केवळ सोशल मीडिया पुरती मर्यादित न राहता नऊ दिवसीय रामकथेच्या आधाराने आतापर्यंत त्यांनी गोंदवले, नैमिषारण्य, लेपा (नर्मदा), अयोध्या, सोमनाथ एवढेच नव्हे तर भारताच्या बाहेर दुबई, बहारीन या ठिकाणी जाऊन रामकथेचे गायन केले आहे.

रवींद्र पाठक हे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांची तळवडे येथे रवी इंडस्ट्रीज या नावाने प्रेशर वेसल्स, हीट एक्स्चेंजर असे अवजड अभियांत्रिकी उपकरण तयार करणारी कंपनी आहे. मागील पंचवीस वर्षापासून देश विदेशामध्ये या उपकरणांची निर्यात या कंपनी द्वारे केली जाते.