सोलर पॅनल योजनेद्वारे जनतेची 18 हजार कोटी रुपयांची बचत,1 कोटी कुटुंबांना फायदा

0
177

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिलासा देत सौर पॅनेल बसवण्यासाठी PM सूर्योदय योजना जाहीर केली होती. पंतप्रधान सूर्योदय योजना म्हणजेच सोलर पॅनल योजनेद्वारे जनतेची 18 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहेत. त्यासोबत मोठ्या प्रमाणात नोकऱ्यादेखील उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पीएम सूर्योदय योजनेबाात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान सूर्योदय योजनेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.

पंतप्रधान सूर्योदय योजनेद्वारे देशातील एक कोटींहून अधिक कुटुंबांना वार्षिक 18,000 कोटी रुपयांची बचत करता येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. यासोबतच सूर्योदय योजनेमुळे लोकांना रोजगाराच्या नवीन संधीही मिळतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मध्ये पीएम सूर्योदय योजनेबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. याबाबत योजनेबाबत सविस्तर जाणून घ्या.

अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली होती. पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी घरांवर सोलर पॅनेल बसण्यात येणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये पीएम सूर्योदय योजनेची घोषणा करताना सांगितलं की, छतावर सौर पॅनेल बसवून एका कुटुंबाला किमान 300 युनिट विजेची बचत करता येईल, ज्यामुळे सुमारे 18,000 कोटींची बचत होईल. देशातील कोट्यवधी कुटुंबे वीज वाचवू शकतील. यासोबतच ही कुटुंबे वीज कंपन्यांना अतिरिक्त वीज विकून अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकतात.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, भारत 2070 चे ‘नेट झिरो’ लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जास्रोतांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सौर ऊर्जेव्यतिरिक्त, पवन ऊर्जा स्त्रोतांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकार अतिरिक्त निधीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. पवन ऊर्जेद्वारे 1,000 मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी सरकार सरकारी वीज कंपन्यांना निधी उपलब्ध करून देणार आहे.
पीएम सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, अशी आशा अर्थमंत्री सीतारामण यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान सूर्योदय योजनेतून निर्माण होणारी ऊर्जा पुरवण्यासाठी कौशल्य असलेल्या तरुणांना रोजगार मिळेल. त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील.