– मोरया गोसावी मंदिरात दर्शन घेऊन आश्विनी जगताप यांचा प्रचार सुरु
पुणे, दि. ५ (पीसीबी) : राज्यात विधानसभेच्या दोन आमदारांचे निधन झाल्याने या रिक्त विधानसभ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. दरम्यान कसबा पेठ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या कसबा मतदारसंघात भाजपचं शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे समोर आले आहे. दिवंंगत आमदारांच्या जागेवर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार व्हायला निघालेल्या भाजपकडून असे शक्तीप्रदर्शनाचा त्यांना फटका बसू शकतो, असेही सांंगण्यात आले.
भाजपकडून कसब्यात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती मंदिर पायी पदयात्रा निघणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.
विधानसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, राज ठाकरे आणि नाना पटोले यांनी फोन करून निवडणूकीत उमेदवार न देण्याचं आवाहन केल्याचं समजतंय. दरम्यान कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुकी बिनविरोध व्हावी यासाठी भाजपच्या मदतीला मुख्यमंत्री शिंदे सरसावल्याचे दिसत आहे.
श्रीमती अश्विनी जगताप यांचा प्रचार सुरू –
आज रविवार (दि. 5) सकाळी 10 वाजता चिंचवड विधानसभा भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवार श्रीमती अश्विनी लक्ष्मणभाऊ जगताप (वहिनी ) यांनी श्री मोरया गोसावी मदिरतील गणपती रायांचे दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या समवेत माजी महापौर माई ढोरे, माजी सत्ताधारीनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, आश्विनी चिंचवडे, विलास मडिगेरी, राजू दुर्गेंसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. उद्या दुपारी १ वाजता मिरवणुकिने श्रीमती जगताप या आपला उमेदवारी अर्ज दाखल कऱणार असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे उपस्थित राहणार आहेत.