सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक !

0
29

दि. १० (पीसीबी)- दिवाळी आणि लगीनसराईच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दराने अभूतपूर्व अशी उसळी घेतली असून, त्यामुळे सामान्य खरेदीदारांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत.सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल ₹1,24,000 प्रति तोळा (10 ग्रॅम) वर पोहोचला असून, मागील वर्षभरात तब्बल ₹46,000 पेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. केवळ सोनंच नव्हे, तर चांदीनेही सर्वकालिक उच्चांक गाठत ₹1,67,000 प्रति किलो या दरावर झेप घेतली आहे.

विशेष म्हणजे, सराफ बाजार उघडताच अवघ्या काही तासांत चांदीच्या दरात ₹7,000 पर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या दरवाढीमुळे बाजारपेठेत घबराटीचे वातावरण आहे.सोन्याचा सणांमध्ये आणि लग्नाच्या खरेदीमध्ये मोठा वाटा असतो. मात्र, सध्याच्या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या लग्नसराईतील हौशीला महागाचा फटका बसत आहे.

अनेक ठिकाणी नागरिक सोन्याच्या खरेदीत कपात करताना दिसत आहेत. “आधी जिथे 5-6 तोळ्यांची खरेदी केली जायची, तिथे आता केवळ 2-3 तोळ्यांवर समाधान मानावं लागतंय,” सोन्याच्या दरवाढीमुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. मागील काही महिन्यांत सोनं-चांदीने दिलेले परतावे आकर्षक ठरले असून, अनेक गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड आणि ज्वेलरीमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या या वाढीमागे जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरची घसरण, क्रूड ऑइलचे दर आणि भू-राजकीय तणाव हे प्रमुख घटक असल्याचे जाणकार सांगतात.सोन्या-चांदीच्या या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमुळे दिवाळीपूर्वी होणारी पारंपरिक सराफ खरेदी यंदा मंदावण्याची शक्यता असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.”लोक विचारपूर्वक खरेदी करत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांची संख्या आणि खरेदी दोन्ही घटली आहेत,” अशी माहिती एका नामांकित सराफाने दिली.