सोनिया गांधी हाॅस्पिटलमध्ये दाखल

0
269

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी): काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या कोरोना बाधित झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांना गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली सध्या रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वास्तविक, यापूर्वी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी कोरोना संसर्गाच्या विळख्यात आल्या होत्या. यानंतर त्यांना संसर्गामुळे काही समस्या येत होत्या, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधींना पुन्हा समन्स बजावले आहे. आता त्यांना 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याआधी ईडीने 8 जून रोजी सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले होते, परंतु कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती.

ईडीने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनाही समन्स बजावले आहे. ते 13 जूनला ईडीसमोर हजर होणार आहेत. मात्र, या प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला.